अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अमेरिकेच्या अधिकृत भेटीचे निमंत्रण दिले आहे. भारतासह शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांसह नवाझ यांच्या धोरणांना पाठिंबा म्हणून हे निमंत्रण असल्याचे मानले जात आहे.
भारतासोबत शांतता राखण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केल्याबद्दल शरीफ यांच्यावर पाकिस्तानच्या सैन्याचा दबाव आहे. ओबामा यांनी ऑक्टोबरअखेरीस शरीफ यांना अमेरिकेला बोलावले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.
पंतप्रधानांची ही भेट महत्त्वाची राहील. दहशतवाद्यांचा पाडाव करून आणि अर्थव्यवस्था बळकट करून या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या शरीफ सरकारच्या धोरणाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे यातून दिसून येते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकृत निमंत्रण लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेम्ब्लीच्या वार्षिक सत्राकरिता शरीफ हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेला जाण्याची अपेक्षा असून, शांतता राखण्याबाबतच्या एका परिषदेचे सहअध्यक्षपद ते भूषवतील. ऑक्टोबरचा दौरा हा द्विपक्षीय व्यवस्थेचा भाग असून तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या दौऱ्यापेक्षा वेगळा असेल. शरीफ यांची २०१३ नंतर अमेरिकेला ही दुसरी भेट असेल.
पाकिस्तानने अमेरिकेच्या मागणीनुसार अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांपासून उत्तर वझिरिस्तानचे आदिवासी क्षेत्र जवळजवळ मुक्त केले असताना आणि अफगाण सरकार व तालिबान यांच्यात शांतता प्रकियेला चालना दिली असतानाच्या महत्त्वाच्या वेळी ओबामा यांचे निमंत्रण आले आहे.