लंडनस्थित भारतीय पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकेत गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे या देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि म्हणूनच देशाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मित्तल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. येथील महत्त्वाच्या ‘आर्सेलर मित्तल क्लेव्हलँड’ पोलादनिर्मिती केंद्रास ओबामा यांनी भेट दिली आणि त्या वेळी ते बोलत होते.
चालू आर्थिक वर्षांत मित्तल यांनी अमेरिकेतील आपल्या कंपनीत सात कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली असून त्यामुळे १५० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अमेरिकेवर गेले दोन वर्षे आर्थिक संकटाचे सावट असतानाही मित्तल यांनी हा गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
गेली शंभर वर्षे आम्ही क्लेव्हलँड येथे पोलादनिर्मिती करीत आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जातीने आमच्या निर्मिती केंद्रास भेट देण्यासाठी आल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे, अशा शब्दात मित्तल यांनी ओबामा यांचे स्वागत केले. क्लेव्हलँड येथे आमच्या पोलादनिर्मिती उद्योगास मिळालेले यश आणि मित्तल यांच्या उद्योगास एकूणच एकत्रितपणे मिळालेले यश यांच्यात घनिष्ठ नाते आहे. आमची सुरुवात आम्हाला कधीच विसरता येणार नाही आणि म्हणूनच मी ही गुंतवणूक केली, असेही मित्तल यांनी सांगितले.