वाढते जागतिकतापमान अमेरिकेपुढे आतंकवादाएवढेच संकट निर्माण करू शकते. अनेक पिढय़ा उद्ध्वस्त होऊ शकतात. यापासून सुरक्षा करण्यास पुढील काळात प्राधान्य राहील, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
ते अमेरिकन तटरक्षक दलाच्या नवनियुक्त जवानांना गुरुवारी संबोधित करत होते. बदलत्या वातावरणाकडे आता दुर्लक्ष करण्यात काही हशील नाही. संशोधक, विश्लेषकांनी याबाबत सूचित केले आहे. तसेच आजी-माजी लष्करी अधिकारी, नौदल अधिकारी व तटरक्षक दलाला याबाबत कल्पना आहे. या संकटाला आतंकवादाएवढेच गंभीरतेने घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
वॉशिंग्टनमधील काही राजकीय विरोधक ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाहीत. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण गेल्या आठ लाख वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. पंधरा सर्वात उष्ण वर्षांमध्ये मागील १४ वर्षांचा समावेश आहे. २०१४ आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष नोंदविले गेले आहे. हिमनद्या वितळत आहेत. यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. ही पातळी एका फुटाने वाढल्यास अमेरिकेला २०० अब्ज डॉलर्सचे नुकसान पोचू शकते, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
यावर सुरक्षा यंत्रणा काम करत आहेत. तसेच संकटांना तोंड देण्याची तयारीही करत असल्याचे ओबामा यांनी सांगितले.