पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

देश एकामागून एक आपली उद्दिष्टे साध्य करत निघाला आहे, भारत आता पुढे निघाला असला तरी विरोधी पक्ष मात्र स्वत:च अडखळून पडत आहेत. राजकीय स्वार्थासाठी केवळ स्वत:चे उद्देश साध्य करण्यामागे लागले असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगॅससप्रकरणी संसदेचे कामकाज रोखणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशमधील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरचित्रसंवादामार्फत साधलेल्या या संवादादरम्यान पंतप्रधानांनी ५ ऑगस्टचे महत्त्व स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यात आले होते, तर मागच्या वर्षी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. आणि या वर्षी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने विजय मिळवला, असे सांगितले. हाच मुद्दा पकडून पंतप्रधानांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, देशाला काय हवे आहे, देश काय साध्य करत आहे, देशात काय बदल होत आहेत, याचे विरोधकांना काही पडलेले नाही. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी ते सतत संसदेचा अपमान करत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

सध्या देशातील बहुतांश नागरिक मानवतेवरील अतिशय मोठ्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी झटत असताना विरोधी पक्ष मात्र ते देशहिताचे कार्य रोखण्यासाठी स्पर्धा करत आहेत. मात्र देशातील नागरिक अशा स्वार्थी आणि देश विरोधी राजकारणाला बळी पडणार नाहीत, विरोधक संसदेचे कामकाज रोखण्यामध्ये व्यग्र आहेत, मात्र देशातील १३० कोटी जनता त्यांना देशाचा विकास थांबवू देणार नाही, असा दावाही मोदी यांनी केला. ‘भारत चल पडा है’ असेही मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केवळ ‘योगी’ नाहीत तर ते ‘कर्मयोगी’ आहेत असा मोदी यांनी गौरव केला. काही लोकांनी उत्तर प्रदेशचा वापर स्वत:च्या कुटुंबाच्या आणि राजकीय फायद्यासाठी केला. त्यांनी त्यांचा विकास साधला मात्र राज्याचा विकास त्यांना साधता आला नाही, अशी टीकाही गांधी घराण्याचे नाव न घेता मोदी यांनी केली.