पीटीआय, भुवनेश्वर

ओडिशामध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती कायम असून यात दोन लाख लोक बाधित झाले आहेत. यामध्ये उत्तरेकडील बालासोर, भद्रक, जाजपूर, मयुरभंज, संबलपूर आणि धेनकानल या सहा जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

दरम्यान, केओंझार जिल्ह्यात बुधवारी पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये भिंत कोसळून एका वृद्धाचा, पुरात बुडून एका मुलाचा आणि साचलेले पाणी पंपाद्वारे बाजूला करताना वीजेचा धक्का लागल्याने एका अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला. केओंझार, सुंदरगड, झारसुगुदा, बारगड, नौपाडा, कालाहंडी, रायगड आणि गजपती या जिल्ह्यांतील काही भागातही पूरपरिस्थिती आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी राज्यात ४४ तालुक्यांतील २६६ गावांना पुराने वेढले असून येथे वेगाने बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येथे वादळी पावसाचा जोर वाढला आहे.

आसाममध्ये आणखी सात जणांचा बळी

गुवाहाटी : आसाममधील पुरातील मृतांची संख्या बुधवारी ७५ वर पोहोचली. मागील २४ तासांत राज्यात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आणखी सात जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. पुरामुळे अजूनही तीन लाख ३२ हजार लोक बाधित असून तेथे वेगाने मदत कार्य सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पुरातील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी नऊ लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही रक्कम पाच लाख एवढी होती. केंद्र सरकारचे सहा सदस्यीय पथक सध्या पुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या पथकाने बुधवारी गोलघाट जिल्ह्याला भेट देऊन बाधितांशी संवाद साधला.