Bhubaneswar Mercedes accident : ओडिशातील भुवनेश्वर येथे मर्सिडीज कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी जामीन मिळालेल्या २० वर्षीय कायदा या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. सौम्य रंजन रथ, असे या आरोपीचे नाव आहे. एका ढाब्यावरील वादानंतर संतापात येऊन, त्याने तीन कामगारांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. त्याबद्दलचे सविस्तर वृत्त ‘विऑन’ने दिले आहे.
ढाब्यावरील वादानंतर कारने धडक देण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या माहितीनुसार, केशुरा परिसरातील एका ढाब्याजवळ रथ याचा काही कामगारांबरोबर वाद झाला होता. या वादानंतर त्याने आपल्या कारने त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर रथ घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कटक-पुरी बायपासवर त्याने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल सात दुचाकींचे नुकसान झाले, तर तीन दुचाकीस्वार जखमी झाले. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बसमधून पळण्याचा प्रयत्न; नागरिकांनी पकडले
अपघातांच्या मालिकेनंतर रथने आपली कार बायपासवर सोडून बसमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त सरवण विवेक एम. यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, सहायक पोलिस आयुक्त अभिमन्यू नायक यांनी वैद्यकीय तपासणीत आरोपी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी बडागडा पोलिस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
जुलैमध्ये मर्सिडीजच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
यापूर्वी, १३ जुलै रोजी शास्त्रीनगर परिसरात रथच्या भरधाव मर्सिडीज कारने मागून दिलेल्या धडकेत ३७ वर्षीय देवी प्रसाद राऊत्रे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असली, तरी अवघ्या तीन आठवड्यांत त्याला जामीन मिळाला होता. पोलिसांनी स्पष्ट केले की, यापूर्वीचे प्रकरण कथित मद्यधुंद आणि बेदरकार वाहनचालकामुळे झालेल्या मृत्यूशी संबंधित आहे, तर सध्याचे प्रकरण जाणूनबुजून लोकांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे.
पोलीस ओळखपत्र आणि वाहन परवान्यावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, आरोपीच्या कारची झडती घेतली असता त्यात तपन पटनायक या एका पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचे ओळखपत्र आढळले आहे. हे ओळखपत्र खरे आहे की बनावट, याबाबत पोलिस कसून पडताळणी करत आहेत. तसेच, आरोपीचा वाहनचालक परवाना आणि कारची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला अधिकृत विनंती करण्यात आली असून, ती कार त्याच्याच कुटुंबातील एका सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
