Odisha Dahibara Food Poisoning update from Jajpur district: मुंबईतील पायधुनी येथे बिर्याणी आणि कलिंगड खाल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातही अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत २७ मुलांसह किमान ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू केली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
उलट्या अन् तापाची लक्षणे
दशरथपूर ब्लॉकमधील पातापूर गावात शुक्रवारी (१ मे) रस्त्यावरील एका विक्रेत्याकडून स्थानिक पदार्थ खाल्यानंतर ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधितांनी ‘कटक दहीवडा’ खाल्ला होता आणि त्यानंतर लगेचच त्यांना उलट्या आणि तापासारखी लक्षणे जाणवू लागली. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे गावात घबराट पसरली. सर्व बाधितांना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले. त्यांना दशरथपूर सामुदायिक आरोग्य केंद्र आणि जाजपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
दहीवडा खाल्ल्याने विषबाधा?
जाजपूरचे जिल्हाधिकारी अंबर कुमार कर यांनी सांगितले की, २१ जणांना प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग यांनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि रुग्णांशी संवाद साधला. “२७ मुलांसह एकूण ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार, ‘दहीवडा’ खाल्याने हा प्रकार घडला असावा. आम्ही खाद्यपदार्थ आणि पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले आहेत,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
नंतर ‘X’ वर दिलेल्या अपडेटमध्ये त्यांनी म्हटले की, “आज जाजपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. राज्य सरकारने या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तीन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळेल याची खात्री करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे,” असेही महालिंग यांनी नमूद केले. तपास सुरू असून चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
