Odisha Elderly Man Tricycle 150 KM: ओडिशामधून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही म्हणून ७३ वर्षीय वृद्धाने तीन चाकी सायकल चालवत सरकारी रुग्णालय गाठले. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्धाचा पाय फ्रॅक्चर असताना त्यांनी तीन चाकी चायकल चालवत १५० किलोमीटरचे अंतर पार केले. बेराहमपूर एमकेसीजी वैद्यकीय महविद्यालय आणि रुग्णालय येथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
१५० किलोमीटरचे अंतर पार करुन गाठले सरकारी रुग्णालय
सुखदेव नाहक (७३) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून, ते नयागड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १५० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या वृद्ध व्यक्तीला दोन दिवसांचा कालावधी लागला. पाय फ्रॅक्चर असताना आणि प्रचंड वेदना होत असताना देखील या वृद्धाने तीन चाकी सायकल चालवत एवढे मोठे अंतर पार केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. एका अपघातानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. दरम्यान, पैसे नसल्याने त्यांना वेळेवर उपचार घेता आले नाहीत.
प्रवासात जेवण करण्यासाठी देखील नव्हते पैसे
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुखदेव नाहक गावात वॉचमन म्हणून काम करतात. अपघातानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बेराहमपूर येथून सरकारी रुग्णालयापर्यंतचे १५० किलोमीटरचे अतंर त्यांनी तीन चाकी सायकलवरुन पार करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांच्याकडे जेवण करण्यासाठी देखील पैसे नव्हते, प्रवासात रस्त्यावर भेटणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या जेवणावर त्यांनी वेळ ढकलली, अशी माहिती समोर आली आहे.
पत्नीचे निधन, मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर
फ्रॅक्चर पायामुळे होणाऱ्या प्रचंड वेदनांचा सामना करत सुखदेव नाहक यांनी १५० किलोमीटरचे अंतर पार करुन सरकारी रुग्णालय गाठले. नाहक यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “या प्रवासासाठी मला दोन दिवस लागले. २०११ साली माझ्या पत्नीचे निधन झाले. माझा मुलगा मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याने तो काम करु शकत नाही, त्यामुळे आर्थिक चणचण असते”. सुखदेव यांनी पाय बरा झाल्यास पुन्हा व्यवस्थितपणे चालता येईल असा विश्वास व्यक्त केला. सरकारी रुग्णालयातील प्रशासनाने ७३ वर्षीय नाहक यांना दाखल करुन घेत त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.
