Naba Das Died: ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नेमकं काय घडलं होतं?

ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झारसुगुडा जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार एका पोलीस कर्मचाऱ्याने हा गोळीबार केला. हा गोळीबार का करण्यात आला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ओदिशात मंत्र्याची पोलिसाकडून हत्या; घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाबा दास यांच्या निधनामुळे राज्याचे मोठे नुकसान- नवीन पटनाईक

दरम्यान नाबा दास यांच्या मृत्यूनंतर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. “नाबा दास यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पक्ष तसेच सरकारमध्ये त्याचे खूप महत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे ओदिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे,” अशा भावना नवीन पटनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.