Odisha Hospital Fire news update regarding ICU patients death toll and rescue operations : ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागात लागलेली आग आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी घटनास्थळी पोहोचले. आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण होते, त्यापैकी ७ रुग्णांचा आयसीयूमध्येच होरपळून मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तसंच, इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय.
अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळवले आहे. परंतु, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक रुग्णांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एससीबी अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची नेमकी संख्या निश्चित केलेली नाही. इतर रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले, जरी अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची तातडीने रुग्णालयात धाव
तर, राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आज सकाळीच भेट दिली. या घटनेबाबत त्यांनी रुग्णलाय प्रशासन आणि पोलिसांशी चर्चा करून जखमींशीही संवाद साधला. तसंच, या घटनेच्या चौकशीचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या घटनेनंतर मुख्यमंत्री माझी यांनी आगीत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांची आणि भाजलेल्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
पूर्व भारतातील सर्वांत जुने रुग्णालय
१९४४ मध्ये स्थापन झालेले एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे पूर्व भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या सरकारी वैद्यकीय संस्थांपैकी एक आहे. हे ओडिशातील सर्वात मोठे रेफरल हॉस्पिटल म्हणून काम करते. या रुग्णालयात राज्य आणि शेजारच्या प्रदेशांमधून गंभीर रुग्ण येतात.
