Odisha Man Carries Sisters Skeleton to Bank: “मी बँकेत खूप वेळा गेलो, पण तिथले लोक मला सांगायचे की ज्याचं खातं आहे त्याला पैसे काढण्यासाठी घेऊन ये. मी त्यांना खूपदा संगितलं की ती आता हयात नाही, पण त्यांना तेच सांगणं चालू ठेवलं. शेवटी वैतागून मी तिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून बँकेसमोर पुरावा म्हणून आणून ठेवला”…हे शब्द आहेत ओडिशाच्या केओन्झार जिल्ह्यातल्या ५० वर्षांच्या आदिवासी जितू मुंडा यांचे. ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी ब्रँचबाहेर आपल्या बहिणीच्या मृतदेहाच्या सांगड्याशेजारी बसलेले जितू मुंडा व्यवस्थेच्या निगरगट्टपणामुळे हताश आणि हतबल झाले होते. आणि परिस्थितीचं हे विदारक दृश्य पाहण्यासाठी तिथे आख्खा गाव गोळा झाला होता!
सोमवारी दुपारच्या सुमारास दियानली गावातले रहिवासी जितू मुंडा त्यांच्या खांद्यावर कुणाच्यातरी मृतदेहाचा सांगाडा घेऊन जाताना दिसले आणि बघणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. सांगाड्याचा कंबरेपासून वरचा भाग एका गोणीत होता आणि फक्त पायाची हाडं जितू मुंडा यांच्या खांद्यावरून समोरच्या बाजूला लोंबत होती. ते दृश्य कुणाही बघणाऱ्याच्या काळजात धडकी भरवणारं होतं.
जितू मुंडा तो सांगाडा घेऊन सरळ ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेबाहेर पोहोचले आणि त्यांनी बँकेच्या दारातच तो सांगाडा ठेवला. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर हा सांगाडा त्यांच्या मृत बहिणीचा असून ती आता हयात नाही याचा पुरावा बँकेला देण्यासाठी म्हणून त्यांनी तो पुरलेला सांगाडा पुन्हा उकरून काढला आणि इथे आणला होता!
फक्त २० हजार रुपयांचा प्रश्न होता
जितू मुंडा यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचं दोन महिन्यांपूर्वी प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं. मृत्यूनंतर रुढी-परंपरेप्रमाणे विधी करून त्यांनी बहिणीचा मृतदेह जमिनीत पुरला होता. बहिणीनं तिची बैलगाडी विकल्यानंतर आलेले २० हजार रुपये तिच्या खात्यात जमा होते. आता तिच्यामागे कुणीही वारस शिल्लक नसल्यामुळे ते पैसे आपल्याला मिळावेत, अशी विनंती घेऊन जितू मुंडा गेल्या दोन महिन्यांपासून बँकेत खेटे घालत होते.
बहिणीला आणा किंवा मृत्यूचा दाखला आणा
जितू मुंडा अशिक्षित असल्यामुळे बँकेतली कागदपत्रांची भाषा त्यांना समजत नव्हती. बँकेचे कर्मचारी वारंवार त्यांच्याकडे बहिणीचा मृत्यू झाल्याचा दाखला मागत होते. या पूर्ण प्रक्रियेपासून अनभिज्ञ आणि ती समजून घेण्यासाठी अक्षम असलेल्या जितू मुंडा यांनी शेवटी वैतागून बहिणीला पुरलेल्या ठिकाणी कुदळ-फावडं घेऊन धाव घेतली आणि पुरलेल्या मृतदेहाचा आता उरलेला सांगाडा एका गोणीत भरून सरळ बँकेची वाट धरली.
जितू मुंडा हे अशिक्षित असून त्यांना मृत्यूचा दाखला किंवा मेलेल्या व्यक्तीच्या वारसांचा मुद्दा समजण्यापलीकडचा होता, तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना हे व्यवस्थित समजावून देण्यातही अपयश आल्याची माहिती नंतर पोलिसांनी दिली. पण हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी जितू मुंडा यांना बहिणीच्या नावे बँकेत असलेले २० हजार रुपये मिळवून देण्यात मदत करतो, असं सांगून त्यांची समजूत घातली. शेवटी पोलिसांसोबतच जितू मुंडा बहिणीच्या मृतदेहाचा सांगाडा घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आले आणि तो सांगाडा पुन्हा तिथे दफन केला.
या प्रकारानंतर स्थानिक प्रशासनाने जितू मुंडा यांना बहिणीच्या खात्यातले पैसे मिळावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश बँकेतील पदाधिकाऱ्यांना दिले.
