शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ओडिशामध्ये झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. जखमींवर रुग्णालयांत उपचार चालू आहेत. एकीकडे हा अपघात कसा झाला? त्यासाठी कोण जबाबदार आहे? तांत्रिक बिघाड झाला होता का? यासंदर्भात सविस्तर तपास केला जात असताना दुसरीकडे या दुर्घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे दावे करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात असून यावर ओडिशा पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडळ एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांच्यात झालेल्या अपघातामुळे मोठी दुर्घटना घडली. अनेक तास बचावकार्य चालू होतं. अखेर रविवारी रात्री उशीरा या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या अपघातासाठी नेमक्या कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या, याचा तपास आता केला जात आहे. हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा, अशीही मागणी केली जात आहे.

अपघाताची सीबीआय चौकशी; रेल्वे मंडळाची शिफारस, सुरक्षा यंत्रणेत फेरफार केल्याचा संशय  

‘त्या’ सोशल मीडिया पोस्ट्सवर पोलिसांचा इशारा!

दरम्यान, अपघाताची छायाचित्रे पोस्ट करून त्यासह काही धार्मिक पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, या पोस्टमध्ये अपघातस्थळाच्या नजीक असणाऱ्या एका बांधकामाचा हवाला देऊन हा अपघात जाणून-बुजून घडवून आणल्याचा कट होता, असा दावा या सोशल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, अपघाताच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच ओडिशा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांचं आवाहन!

“ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पद्धतीने धार्मिक रंग देऊन दावे केले जात आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमची सगळ्यांना विनंती आहे, की अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करू नयेत. चुकीच्या आणि धार्मिक रंग देणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करून दोन धर्मीयांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं ओडिशा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. जीआरपी पोलिसांकडून या अपघातासंदर्भातल्या सर्व बाजूंची सविस्तर तपासणी केली जात आहे, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha police warns social media posts giving communal color to balasore train accident pmw
First published on: 05-06-2023 at 09:01 IST