कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी दावा केला की काही अज्ञात व्यक्तींनी ओडिशातील काँग्रेस आमदारांना १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा प्रकार भाजपच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ चा भाग असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस आमदारांना बिदादी येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी चार व्यक्ती रोख रक्कम घेऊन आमदारांशी संपर्क साधण्यासाठी आल्या आणि त्यांना क्रॉस-व्होटिंग करण्यासाठी प्रलोभन दिले.

स्थानिक व्यक्तीच्या मदतीने आमिष

शिवकुमार म्हणाले, “चार लोक आमदारांशी संपर्क साधण्यासाठी आले होते. सुरेश नावाच्या स्थानिक व्यक्तीने त्यांना मदत केली होती. त्यांनी आमदारांशी ऑनलाइन संपर्क साधला आणि सकाळी आमच्या आमदाराला भेटले. त्यांनी प्रत्येक मतासाठी ५ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. मात्र आमच्या आमदारांनी स्पष्ट सांगितले की ते घोडेबाजारासाठी तयार नाहीत.”

त्यांनी पुढे सांगितले की या प्रकरणात संबंधित चेक आणि इतर पुरावे जप्त करण्यात येणार आहेत. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल आणि त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

शिवकुमार यांच्या मते, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनीही ते याच उद्देशाने आले असल्याची कबुली दिली आहे. “त्यांनी हे मान्य केले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. कर्नाटकात भाजपच्या मित्रांकडून चालवलेले हे मोठे ‘ऑपरेशन लोटस’ आहे,” असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे आमदार रविवारी रात्री भुवनेश्वरला रवाना होणार आहेत. ते सोमवारी सकाळी राज्यसभेच्या मतदानात सहभागी होणार आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार उभा केला असल्याने घोडेबाजाराची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आणि बिजू जनता दल यांनी प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे.