Odisha Rape Case : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. देशभरातील विविध राज्यांत महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. लहान मुलींपासून वयोवृ्द्धांवर लैंगिक अत्याचार होत असल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. आता ओडिशामधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मानसिक आजार असलेल्या वडिलांबरोबर राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीवर अनेक महिने बलात्कार होत होता. या प्रकरणी अखेर तिने पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पीडिता सात महिन्यांची गरोदर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही महिला आता सात महिन्यांची गरोदर आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने शनिवारी तिची सुटका केली. हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला आणि मुलांना सेवा पुरवणाऱ्या एका जिल्हा केंद्राच्या देखरेखीखाली ती आहे.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तरुणीची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यामुळे ती तिच्या वडिलांबरोबर या पडक्या घरात राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला असून वडिलांना मानसिक आजार आहे.
हेही वाचा >> मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही पीडितेच्या वक्तव्याची उलटतपासणी करत आहोत. या प्रकरणात सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले जात आहे. एका डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि एसपी थेट या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
या घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना, उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी ढेंकनाल एसपीशी यांच्याशी चर्चा केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एका वरिष्ठ जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेला समुपदेशन आणि सर्व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत. तसंच, तिच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी पावले उचलली जात आहेत.