Plane Crashesh in Odisha: ओडिशामध्ये शनिवारी दुपारी ९ आसनी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर राउरकेला हवाई धावपट्टीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर विमानाचे क्रॅश लँडिंग करण्यात आले, अशी माहिती मिळत आहे. सदर विमान भुवनेश्वार ते राउरकेला असा प्रवास करत होते. इंडियावन एअरचे हे विमान असून विमानात पायलटसह सहा प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे.

भुवनेश्वरहून दुपारी १२.२५ वाजता भारतीय वेळेनुसार विमानाने उड्डाण घेतले होते. विमानात दोन वैमानिक आणि चार प्रवासी होते. दुपारी १.१४ वाजण्याच्या सुमारास वैमानिकाने राउरकेला एटीसीकडे मे डे कॉल दिला. त्यानंतर दुपारी १.२० वाजता राउरकेला विमानतळापासून सुमारे १५ ते २० किमी अंतरावर अलीकडे एका मोकळ्या जागेत क्रॅश लँडिंग केले.

सदर घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाने तातडीने मदतकार्य सुरू केले. बचाव पथक आणि वैद्यकिय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाने (बीपीआयए) क्रॅश लँडिग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमानाच्या यंत्रणेत यांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायलटने गवताळ प्रदेशात बेली लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे प्रवाशी वाचले. यात पायलटलाही दुखापत झाल्याचे कळते, मात्र दुखापतीची तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सदर घटनेची तक्रार नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरोकडे (AAIB) करण्यात आली आहे. डिजीसीएने दिलेल्या निवेदनात म्हटले की, इंडियावन एअर ही एक शेड्यूल कम्युटर ऑपरेटर (५,७०० किलोपेक्षा कमी वजनाचे विमान वाहक कंपनी) कंपनी आहे. त्यांच्याकडे तीन सेसना ग्रँड C208B विमानांचा ताफा आहे. ओडिशाच्या भुवनेश्वर स्थित ही कंपनी २०२२ पासून ओडिशा आणि आसपासच्या टायर ३ शहरांमध्ये राज्य सरकारच्या परवानगीने विमानसेवा देत आहे.

या दुर्घटनेवर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी लिहिले, “राउरकेला येथे झालेल्या विमान अपघाताबद्दलची बातमी ऐकून खूप दुःख झाले. भगवान जगन्नाथाच्या कृपेने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची बातमी दिलासा देणारी आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना त्वरित सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देश मी दिले आहेत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”