ओडिशा ट्रेन अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताने सगळा देश हादरला. या अपघातानंतर ५१ तास वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु होतं. या अपघातानंतर गदारोळ आणि गोंधळही झाला. तसंच मृतदेहांची ओळखही पटवली जात होती. मात्र हेलाराम मलिक यांना आशा होती की आपला मुलगा जिवंत आहे. त्यांनी शोध सुरुच ठेवला अखेर मृतदेहांच्या ढिगातून त्यांनी आपल्या मुलाला शोधलंच. या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे.
नेमकी काय घडली घटना?
ओडिशा ट्रेन अपघातात २४ वर्षीय बिस्वजीत मलिक हा मुलगा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याचा मृत्यू झाला आहे असं बचाव पथकाला वाटलं होतं. त्यामुळे या मुलाला मृतदेहांच्या ट्रकमध्ये ठेवलं गेलं. हा ट्रक शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जाणार होता. त्यावेळी हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाचा शोध सुरु केला. या मृतदेहांच्या ट्रकमध्ये त्यांना आपल्या मुलाचा हात हलताना दिसला. त्यावेळी त्यांनी तातडीने बचाव पथकाला सांगितलं माझा मुलगा जिवंत आहे. त्यानंतर कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात मुलाला आणलं गेलं. डॉक्टर म्हणाले की बिस्वजीत मलिकची प्रकृती नाजूक आहे. काही दिवसात त्याच्यावर सर्जरी करण्यात येईल. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.