ओडिशातल्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ७४७ प्रवासी जखमी झाले आहेत. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी केली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन हा अपघात झाला. ही ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरच्या ट्रेनला धडकली. त्यानंतर एक मालगाडी या दोन्ही ट्रेन्सना धडकली. त्यामुळे भयंकर अपघात झाला. ओडिशा अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ओडिशा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरची पाहणी केली. त्यानंतर कटक या ठिकाणी जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांशीही संवाद साधला. उपचार योग्य पद्धतीने सुरु आहेत ना? याची माहिती त्यांनी डॉक्टरांकडून घेतली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला ओडिशा दौरा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ओडिशा दौरा केला. या अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ममता बॅनर्जींनी केली आहे. तसंच अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने ११० अँब्युलन्स आणि ४० डॉक्टर आम्ही मदतीसाठी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्कात आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.

दोन्ही ट्रेन्समध्ये ३५०० प्रवासी करत होते प्रवास

कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये १७५६ प्रवासी तर विश्वेस्वरय्या हावडा एक्स्प्रेसमध्ये १७४४ प्रवासी होते. शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमधील बहनगा स्थानाकाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की, करोमंडल एक्सप्रेस रुळावरुन खाली उतरली. या अपघातात सुरुवातील मृतांची संख्या ५० च्या आसपास होती मात्र त्यानंतर या रेल्वे अपघातातील मृतांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून ७४७ जण गंभीर जखमी झाली आहेत. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच वेळी रुळावर आल्याने हा अपघात झाला. अनेक प्रवासी या अपघातात अडकले असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. एनडीआरएफ, रेल्वे यांच्या पथकाकडून अनेक लोकांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आले. परंतु मृतांचा आकडा जास्त असल्याने त्यांची ओळख पटवून देण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha union railway minister ashwini vaishnaw inspects the restoration work underway killing 288 people and injuring 747 scj
First published on: 04-06-2023 at 08:07 IST