केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या एका महिला अधिकाऱ्याला पाणी देताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या या कृतीचे जोरदार कौतुक होत आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भाषण देत होत्या. त्यावेळी ही घटना घडली.

पद्मजा चंदुरु यांनी भाषणादरम्यान, पाणी मागितले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन त्यांच्याकडे पोहोचल्या. कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये चंदुरू त्यांच्या भाषणाच्या मध्येच थांबतात आणि पाणी मागतात. पाण्याकडे इशारा केल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन व्यासपीठावर पोहोचल्या. त्यांनी बाटलीमधून पद्मजा यांना ग्लासात पाणी दिले. त्यानंतर पद्मजा यांनी आपले भाषण चालू ठेवले.

या कृतीने भारावून, चंदुरू यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आणि सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. ही घटना शनिवारी एनएसडीएलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाशी संबंधित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी एनएसडीएलचा गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम ‘बाजार का एकलव्य’ लाँच केला.

व्याज दरवाढीची वेळ आश्चर्यकारक

दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेने अलीकडेच व्याजदरांत केलेली वाढ आश्चर्यकारक नव्हती. मात्र, तिची वेळ आश्चर्यकारक होती, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०१८ नंतर पहिल्यांदाच रिझव्‍‌र्ह बँकेने ४ मे रोजी रेपो दरात ४० बेसिस पॉइंटची वाढ केली, तसेच सीआरआर ५० बेसिस पॉइंट्सनी वाढवून ४.५ टक्के केला. युक्रेनमधील युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर चलनफुगवट्याचा दबाव आल्याचे बँकेने म्हटले होते.

“रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याज दरवाढीची वेळ आश्चर्यकारक आहे, पण ही कृती मात्र नाही,  कारण हे होणारच होते, याचा लोकांनी विचार केला होता. मात्र, आर्थिक धोरण समितीच्या दोन बैठकांदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे आश्चर्य वाटले,” असे सीतारामन म्हणाल्या.