गोवा निवडणुकीसाठी काही महिने बाकी असल्याने अनेक राजकीय नेत्यांचे गोवा दौरे सध्या सुरु आहेत. एकीकडे ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा सुरु असतांना राहुल गांधीही गोवा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी आज वेल्सोओ इथे मच्छिमार बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित बहुतांश मच्छिमार बांधव हे कोकणी भाषेत प्रश्न विचारत होते. त्याचे भाषांतर करुन राहुल गांधी यांनी सांगितलं जात होते आणि त्यानंतर राहुल गांधी हे इंग्रजीतून या समस्येवर मत व्यक्त करत होते. त्याचेही भाषांतर करुन कोकणी भाषेत सांगितलं जात होतं. 

असा संवादाचा कार्यक्रम सुरु असतांना एका मच्छिमार बांधवाने इंग्रजीतून प्रश्न विचारत पेट्रोल महाग झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. एवढे महाग पेट्रोल मच्छिमार बोटीसाठी परवडत नाही असं सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्या मच्छिमार बांधवाचे बोलणे मध्येच थांबवत राहुल गांधी म्हणाले “अरे भावा, मला आशा आहे की तुला माहित असेल, मी भाजपचा नाहीये, मी काँग्रेसचा आहे “. असं वक्तव्य केल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ती व्यक्ती म्हणाली “आश्वासन दिल्यावर तुम्ही उद्या सत्तेत आल्यावर असं वागू नका. हे मी आत्ताच सांगतो”. तेव्हा मग राहुल गांधी यांनी २०१४ ला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर जास्त होते, तरीही इंधनाचे दर कसे कमी होते. आता क्रुड ऑईलचे दर कमी असून सुद्धा इंधनाचे दर कसे जास्त आहेत हे स्पष्ट केलं. इंधनाच्या वाढलेल्या दरांबाबत आम्हाला दोष देऊ नका असंही संबंधिताला सांगितलं.

दरम्यान ५० मिनीटांच्या या संवाद कार्क्रमात राहुल गांधी यांच्यासमोर मच्छिमार बांधवांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. गोवा हे कोळशाचे हब झाले तर पर्यावरणावर कसा परिणाम होईल, परप्रांतिय मच्छिमार इथल्या समुद्रात कसे घुसखोरी करत आहेत, रेल्वेच्या विस्ताराचा कसा फटका बसणार आहे, याबाबत व्यथा मच्छिमार बांधवांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा नागरीकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल असं आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिलं. असाच संवाद साधत लोकांची मते जाणुन घेतल्यावरच गोवा निवडुकीसाठीचा काँग्रेसचा जाहिरनामा तयार केला जाईल आणि जाहिरनाम्यात जे आश्वासन दिलं जाईल ते पुर्ण केलं जाईल असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.