आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर घसरल्याचे परिणाम भारतीय बाजारात दिसत आहेत. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांनी कपात केली आहे. इंडियान ऑइल साइटने दिलेल्या वृत्तानुसार गुरूवारी कंपनीने लिटरमागे पेट्रोलचे दर ९ पैसे तर डिझेलचे दर ७ पैशांनी कमी केले आहेत.

बुधवारी पेट्रोलच्या दरात ११ पैसे आणि डिझेलच्या दरात ८ पैशांची कपात करण्यात आली होती. मंगळवारीही पेट्रोल १४ आणि डिझेल १० पैशांनी स्वस्त झाले होते. दरकपातीनंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल सर्वांत स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोल ७७.२३ रूपये आणि डिझेल ६८.७३ रूपये प्रति लिटर आहे.

तर दुसरीकडे दर कपातीमुळे मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक आहे. मुंबईत दरकपातीनंतर पेट्रोल ८५.४५ रूपये आणि डिझेल ७३.१७ रूपये प्रति लिटर आहे. २९ मेपासून आतापर्यंत पेट्रोल ८३ पैसे आणि डिझेल ६१ पैशांनी स्वस्त झाले आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर सलग १६ दिवस दर वाढवल्यानंतर २९ मे रोजी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केले होते. तत्पूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी इंधनाचे दर तेल कंपन्या निश्चित करतात. यात सरकारची कोणतीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते. गत आठवड्यात कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात अवघ्या एक रूपयांची कपात केली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी यावरून तेल कंपन्या आणि सरकारवर टीकास्त्र सोडले होते.