Iran Oil Refinery Attack: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला असला तरी या वाटाघाटींनंतर काही तासांतच इराणमध्ये पुन्हा हल्ला झाला आहे. इराणच्या लावान बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले आहे. हा शत्रूने केलेला हल्ला असल्याचे इराणी यंत्रणेने म्हटले आहे. इराणी तेल मंत्रालयाची वृत्तसंस्था ‘शाना’ने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल इराणी ऑइल रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीने हल्ल्याची माहिती दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार १०:०० वाजता सुविधेला आग लागली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा आणि अग्निशमन यंत्रणा तात्काळ तैनात करण्यात आली.
इराणकडून आखाती देशांवर हल्ले
तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) प्रत्युत्तर दिले असून कोणत्याही हल्ल्याला त्यापेक्षा अधिक आक्रमकतेने उत्तर दिले जाईल, असे सांगितले. आयआरजीसीने पर्शियन आखातामधील काही ठिकाणांना लक्ष्य केले. तसेच सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारीन आणि कुवैतमधील काही ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
अमेरिकेवर आमचा विश्वास नाही
आयआरजीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, इराणने विविध देशात तब्बल २५ ठिकाणांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेवर आमचा विश्वास नाही आणि कोणत्याही हल्ल्याला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
आयआरजीसीने टेलिग्राम चॅनेलवर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “आमच्या शत्रूने नेहमीच कपटाचा मार्ग निवडला. आमचा त्यांच्या आश्वासनावर बिलकुल विश्वास नाही. आमच्यावर जर कोणताही हल्ला झाला तर आम्ही अधिक आक्रमकतेने त्यावर उत्तर देऊ.”
आखाती देशांनी अमेरिकेबरोबर असलेले त्यांचे संबंध कमी करून त्यांना सहकार्य करणे थांबवावे. इराणचे सैनिक हे फक्त सर्वोच्च नेते, लष्करी दलाचे एकमेव नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांच्या आदेशाचे पालन करतात आणि खामेनी यांचे बोट सदैव बंदुकीच्या चापावर आहे, हे लक्षात ठेवावे, अशा शब्दात इराणने इतर आखाती देशांना इशारा दिला आहे.
लावान बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर छोटासा हल्ला झाल्यानंतर इराणने कुवैत आणि यूएईमधील तेल प्रकल्पांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, अशी माहिती सरकारी वाहिनीने दिली आहे.
