सिएरा लिओनमध्ये तेलाच्या टँकरला बसने धडक दिल्याने झालेल्या स्फोटात ९२ जण ठार झाले आहेत. हे ठिकाण फ्रीटाऊनच्या पूर्वेस आहे.  हा अपघात वेलिंग्टन परिसरात शुक्रवारी रात्री घडला. बसने धडक देताच तेलाच्या टँकरने पेट घेतला. स्फोटात ९२ जणांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी गळती झालेले तेल घेण्यासाठी लोक जमा झाले होते. त्यातील अनेक जण स्फोटात जखमी झाले आहेत, असे शनिवारी अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोनॉट रुग्णालयातील कर्मचारी फोडे मुसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या रुग्णालयाच्या शवागारात दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या ९२ जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी आणण्यात आले. जखमींपैकी ३० जण गंभीररीत्या भाजले असून ते जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे.

असोसिएटेड प्रेसने जारी केलेल्या दुर्घटनेच्या चित्रफितीमध्ये दिसत आहे की, स्फोटानंतर आगीचा प्रचंड लोळ आसमंतात उसळला.

दुर्घटना घडली त्या वेळी राष्ट्राध्यक्ष जुलिएस माजा बिओ हे स्कॉटलंडमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत होते. त्यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. उपाध्यक्ष मोहम्मद जुल्हेह यांनी रात्रीच दोन रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली. ही दुर्घटना म्हणजे राष्ट्रीय आपत्ती असून आपत्तीनिवारण पथके अविरत काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.