OLA Auto Driver News: ओला, उबर, रॅपिडो अशा प्रवासी वाहतूक कॅब सेवा सध्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. पण त्याचवेळी या सेवांसंदर्भातल्या तक्रारीदेखील ऐकायला मिळतात. काही प्रकरणांत तर महिला प्रवाशांनी चालकांविरोधात थेट विनयभंगाच्या तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत. त्यामुळे या सेवांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता ओला कॅब सेवेसंदर्भातील एका प्रकरणात ग्राहक न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. प्रवासी महिलेला ५० हजार रुपये नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त ५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने OLA कंपनीला दिले आहेत.

OLA कंपनीविरोधात नेमका काय खटला होता?

हे प्रकरण आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर सुनावणीसाठी आलं होतं. मंचाचे अध्यक्ष करनम किशोर कुमार व इतर दोन सदस्य नारायणन रेड्डी व नाझीमा कौसर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदार महिलेनं मंचासमोर संबंधित ओला चालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या घटनेचा सविस्तर तपशील तक्रारदार महिलेनं तक्रारीत केला आहे.

काय घडलं होतं ‘त्या’ दिवशी?

  • ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रारदार महिलेनं गुंटूर ते आचार्य नागार्जुन विद्यापीठ या अंतरासाठी ओला रिक्षा बुक केली. कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षेसाठी सदर महिला विद्यापीठात जात होती. महिलेसोबत तिची आईदेखील होती.
  • ओला रिक्षाचालक मोबाईल अॅपमध्ये दिलेल्या रिक्षाऐवजी वेगळीच रिक्षा घेऊन तिथे दाखल झाला. त्यानंतर फेरी सुरू होण्याआधीच सदर महिलेकडून ओटीपीची मागणी करू लागला.
  • नंतर नागार्जुन विद्यापीठातील परीक्षा केंद्रावर जाण्याऐवजी ओला चालकानं वेगळा मार्ग निवडला आणि परीक्षा केंद्रापासून तब्बल २५ किलोमीटर अंतरावर रिक्षा थांबवली. त्यानंतर पुन्हा परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी ऑटो चालक करू लागला, असा दावा महिलेनं तक्रारीत केला आहे.
  • जेव्हा महिलेनं अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा चालकानं त्या दोघींना तिथेच सोडलं आणि तो निघून गेला.
  • त्यानंतर सदर महिलेला तिच्याच खर्चानं वेगळी ऑटो रिक्षा बुक करून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचावं लागलं. यामुळे तिला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला ज्याचा परिणाम तिच्या परीक्षेवर झाला, असाही दावा महिलेनं तक्रारीत केला.

आपल्याला सहन कराव्या लागलेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई म्हणून सदर महिलेनं ५ लाख रुपयांची मागणी केली होती. ग्राहक मंचाने तिचे आरोप मान्य केले असले, तरी दंडाची रक्कम कमी केली आहे. कंपनीने महिलेला ५० हजार रुपये नुकसानभरपाई व ५ हजार रुपये प्रकरणाचा खर्च अशी ५५ हजारांची रक्कम देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने ओला कंपनीला दिले.

ग्राहक मंचानं कोणते मुद्दे मांडले?

तक्रारदार महिलेचं म्हणणं ग्राह्य धरत ग्राहक मंचाने ओला कंपनीला दंड ठोठावला. यासंदर्भात न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं मुद्द्यांच्या स्वरूपात नोंदवली.

  • उपलब्ध पुरावे, रूट मॅप यावरून हे स्पष्ट होत आहे की संबंधित रिक्षाचालकाने बेजबाबदार वर्तन केलं आहे.
  • एका महिलेला तिच्या आईसह रस्त्यावर अशा पद्धतीने सोडून देणं हे त्यांच्यासाठी मनस्ताप, भीती, अवमान आणि भावनिक तणाव निर्माण करणारं आहे.
  • इतक्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवाराला अशा प्रकारे परीक्षेआधी केंद्रावर पोहोचण्यासाठी इतकी धावपळ करावी लागली तर त्याचा साहजिकच मानसिक शांततेवर, लक्ष केंद्रीत करण्यावर परिणाम होणार.
  • आपण फक्त प्रवासी व वाहन चालक यांच्यातील मध्यस्थाचं काम करत असून चालकांच्या वर्तनासाठी आपल्याला जबाबदार धरलं जाऊ नये, हा ओला कंपनीचा युक्तिवाद ग्राहक मंचानं फेटाळून लावला.
  • सदर रिक्षा ही ओलाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बुक करण्यात आली होती. ओटीपीही कंपनीच्या अॅपवरून तयार झाला होता. शिवाय, संबंधित रिक्षाचालकदेखील कंपनीशी करारान्वये संबंधित आहे, असं मंचानं नमूद केलं.
  • ओला कंपनीबाबतची विश्वासार्हता, कंपनीकडून दिली जाणारी हमी या गोष्टींवर विश्वास ठेवूनच तक्रारदार महिलेनं कंपनीची सेवा निवडली होती.
  • आपण फक्त मध्यस्थ आहोत, असं म्हणून ओला कंपनी त्यांची सेवा घेणाऱ्या ग्राहकांबद्दलची जबाबदारी झटकू शकत नाही.