पीटीआय, बंगळूरु : ओला, उबर, रॅपिडो या वाहन सेवा पुरवणाऱ्या संस्थांना कर्नाटकच्या परिवहन विभागाने नोटीस पाठवली आहे. या वाहन सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी त्यांची तीनचाकी (ऑटोरिक्षा) सेवा बंद करावी, अशी सूचना या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. या ऑटोरिक्षांचे चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केल्या आहेत. त्याशिवाय प्रवाशांना त्रास देणे, लायसन्सशिवाय रिक्षा चालवणे अशा तक्रारीही करण्यात आलेल्या असल्याने त्यांची गंभीर दखल परिवहन विभागाने घेतली आहे.

परिवहन विभागाने या संस्थांना त्यांच्या अ‍ॅपमधून तीन दिवसांत ऑटोरिक्षाचा पर्याय काढून टाकावा, असेही परिवहन विभागाने या नोटिशीत म्हटले आहे. बंगळूरुच्या परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त हेमंथा कुमारा यांनी याबाबत सांगितले की, ‘‘आम्ही ग्राहकांना होणारा त्रास सहन करू शकत नाही आणि जास्त दरांचे समर्थन करू शकत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने या कंपन्यांना बंगळूरुमधील ऑटोरिक्षाची सेवा बंद करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.’’ दरम्यान, ओला आणि उबर इंडियाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.