हरयाणातील एका पळून गेलेल्या जोडप्याने संरक्षणासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाने या जोडप्याला संरक्षण तर दिलेच पण पलवल जिल्हा पोलीस प्रमुखांना या लग्नात काही गडबड आहे का, याचा तपास करण्याचेही आदेश दिले आहेत. याचं कारण म्हणजे या लग्नातील नवरदेव ६७ वर्षांचा असून नवरी मुलगी फक्त १९ वर्षांची आहे. न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी यांच्या खंडपीठाने या लग्नाबद्दल संशय व्यक्त केलाय. तसेच पोलीस अधीक्षक पलवल यांना एका आठवड्यात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे. या जोडप्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणीही हस्तक्षेप करू नये आणि त्रास देऊ नये तसेच त्यांच्या जीवन आणि स्वातंत्र्यासाठी संरक्षण मागितले होते.

याचिका ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पुरी म्हणाले, “हे प्रकरण खरचं धक्कादायक आहे. यातील एक  याचिकाकर्ता ६७ वर्षांचा असून दुसरी १९ वर्षांची आहे. त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केल्याचा दावा केलाय. पण या व्यक्तिचे यापूर्वी किती विवाह झाले आहेत, किंवा या १९ वर्षीय मुलीचे या व्यक्तिशी कोणत्या परिस्थितीत लग्न झाले हे याचिकाकर्त्यांच्या याचिकांमधून किंवा वकिलांनी केलेल्या युक्तिवादातून स्पष्ट होत नाही”. न्यायमूर्तींनी या विवाहासंदर्भात शंका उपस्थित करत हे लग्न जबरदस्ती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत नोंदवलंय. 

दोघांची चौकशी करण्याचे आदेश..

कोर्टाने पलवल पोलीस अधिक्षकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेत या तरुणीची भेट घेण्यास सांगितले आहे. तसेच त्या ६७ वर्षीय व्यक्तीची कौटुंबीक पार्श्वभूमी आणि इतर चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या दोघांची चौकशी केल्यानंतर दोघांना संरक्षण द्यायचे की नाही, याबाबत न्यायालय निर्णय देईल. तत्पूर्वी जबाब नोंदवण्यासाठी दोघांनाही दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले जाईल. त्यानंतर पलवल पोलीस अधीक्षक यांना याप्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागणार आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास एका आठवड्यात करण्यास हायकोर्टाने सांगितले आहे.