जुन्या कार कमी किंमतीत विकण्यापेक्षा किंवा भंगारमध्ये टाकण्यापेक्षा त्यांना इलेक्ट्रिक वाहन (EV – Electric Vehicle) मध्ये बदलल्यास ५० हजार रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडिजसारख्या महागड्या कार जुन्या झाल्यानंतर त्या खूप कमी किंमतीत विकाव्या लागतात. आता अशा जुन्या झालेल्या कारला EV मध्ये बदलण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. कारला EV मध्ये बदलून त्या पुन्हा उपयोगात आणता येणार आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया.

दिल्लीत १५ ते २० वर्ष जुन्या झालेल्या पेट्रोल – डिझेलच्या कारला रस्त्यांवर धावण्यास बंदी आहे. जुन्या कार आढळल्यास एकतर त्यांचे चलन फाडले जाते किंवा त्यांना जप्त केले जाते. हवा प्रदूषण रोखण्यासाठी असे कडक नियम सध्या दिल्लीत लागू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने जुन्या झालेल्या कारला EV मध्ये बदलून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी पहिल्या १००० कार मालकांना ५० हजार रूपयांचे बक्षीस दिल्ली सरकार देण्याच्या तयारीत आहे. जूनी झालेली पेट्रोल – डिझेल कार EV मध्ये बदलल्यास ती वापरात आणता येईल. त्यामुळे अशा जुन्या कार दिल्ली बाहेरील राज्यात स्वस्तात विकण्याची किंवा भंगारमध्ये देण्याची नामुश्की कार मालकांवर ओढावणार नसल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीत सध्या भाजपाचे सरकार आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या सरकारने जुन्या पेट्रोल डिझेल कार EV मध्ये बदलल्यास कार मालकांना बक्षीस देण्याचा विचार केला होता. परंतु, त्यावेळी कारला EV मध्ये बदलणे अधिक खर्चिक होते. दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या कार मॉडेलला EV मध्ये बदलण्यासाठी खर्चही वेगवेगळे येतात. पेट्रोल डिझेल कारला EV मध्ये बदलण्यास खर्चही अधिक येतो. त्यामुळे सरकार आता अशा कार मालकांना बक्षीस देण्याचे नियोजन करत आहे. कारला EV मध्ये बदलण्यासाठी बक्षीस किंवा अनुदान दिले तर कार मालकांवर त्यांच्या कार स्वस्तात विकण्याची वेळ येणार नाही. तसेच त्यांना कार पुन्हा एकदा उपयोगात आणता येतील.”

महागड्या कार असणाऱ्यांना होणार फायदा

दिल्लीतील परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अधिकारी म्हणाला, बीएमडब्ल्यू व मर्सिडिज सारख्या अलिशान व महागड्या कार मालकांना त्यांची कार जुनी झाल्यानंतर विकावी किंवा भंगारमध्ये द्यावी वाटत नाही. त्यांनी अंदाजे कारमध्ये ५० लाख रूपये गुंतवलेले असतात, पण ती विकताना त्यांना अगदीच किरकोळ रक्कम मिळते. दिल्ली सरकारने दिलेले अनुदान स्वरूपातील बक्षीस अशा कार मालकांना त्यांच्या महागड्या कार पुन्हा एकदा उपयोगात आणण्यासाठी महत्वाचे ठरेल. असे तो अधिकारी म्हणाला. दरम्यान, दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.