लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर, बिर्ला यांनी गुरुवारी लोकसभेत विरोधकांना फैलावर घेतले.

लोकसभा ही कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेने नव्हे तर संसदीय नियमांनुसार चालते. सभागृहातील प्रत्येक सदस्याने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणीही नियमांपेक्षा ज्येष्ठ नाही, असे बिर्ला म्हणाले.

बिर्ला म्हणाले की, अध्यक्षपद हे कोणत्याही पक्षाचे नसून संपूर्ण सभागृहाचे आहे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे. बिर्ला यांच्या विरोधातील प्रस्ताव फेटाळल्यामुळे बिर्ला लोकसभाध्यक्षपदी कायम राहतील.

बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरही टीका केली. “माइकचे बटन माझ्याकडे नसते. माइक मी बंद करत नाही,” असे बिर्ला म्हणाले. राहुल गांधींना बोलू दिले जात नाही, त्यांच्या भाषणात २० वेळा अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मी कोणत्याही खासदाराला बोलण्यापासून अडवत नाही. नियमाचे उल्लंघन न करता कोणीही सदस्य सभागृहात बोलू शकतो. नियम सत्ताधारी तसेच, विरोधकांसाठी समान असतात, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.