नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काही काँग्रेस खासदार अनुचित प्रकार करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मीच मोदींना सभागृहात येऊ नका असा सल्ला दिला, असे स्पष्टीकरण गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात दिले. बिर्ला यांनी सभागृहात हे निवेदन देऊन काँग्रेसच्या खासदारांकडून मोदींच्या जिवाला धोका निर्माण झाला असता, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मोदी बुधवारी उत्तर देणार होते मात्र, लोकसभेत आक्रमक झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांमुळे पंतप्रधान मोदी सभागृहात आले नाहीत. मोदी संसदेत असून ते सभागृहात आले नाहीत. सत्ताधारी बाजूच्या मोदींच्या आसनाला काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेराव घातला होता. सभागृह तहकूब झाल्यानंतरही या महिला खासदार तिथून बाजूला होण्यास तयार नव्हत्या. त्यांचा हेतू मोदींचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा होता असा आरोप भाजपने केला. हा मुद्दा लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी गुरुवारी लोकसभेत मांडला.

‘जेव्हा पंतप्रधान सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार होते, तेव्हा मला माहिती मिळाली होती की, काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ एखादी अनुचित घटना घडवू शकतात. जर अशी घटना घडली असती, तर देशाच्या लोकशाही परंपरेच्या चिंधड्या उडाल्या असत्या. हे टाळण्यासाठी, मी पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली, असे बिर्ला म्हणाले. काही खासदारांनी लोकसभा सभागृहात गैरवर्तन केले होते, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी पूर्वमाहिती मिळाली होती.

आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीही लोकसभेत उत्तर दिले नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या उत्तराविना चर्चेचा प्रस्ताव गुरुवारी लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. २००४ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा प्रस्ताव पंतप्रधानांचे भाषण न होताच मंजूर झाला.

राजकीय मतभेद लोकसभाध्यक्षांच्या दालनापर्यंत आणण्याची या सभागृहाची परंपरा कधीच नव्हती. पण, बुधवारी जे घडले, तो संसदेच्या इतिहासातील एक काळा डाग आहे. – ओम बिर्ला, लोकसभाध्यक्ष