US attack on Indian sailors updates 3 killed in Oman sea missile strike: “मी काळजी घेत आहे, लवकरच घरी येईन…” हे त्यांचे शेवटचे शब्द ठरतील आणि ही भेट कधीच न होणारी असेल, अशी कल्पनाही त्यांच्या कुटुंबाने केली नव्हती. ओमानच्या समुद्रात एका व्यापारी जहाजावर अमेरिकन सैन्याने केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘एमटी सेटबेलो’ या पलाऊचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर ९ जून रोजी हा हल्ला झाला होता. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन नौदलाने लागू केलेली नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली.
या भीषण हल्ल्यात विशाखापट्टणमचे चीफ इंजिनिअर सुरेश पटनाला (वय ३९), हिमाचल प्रदेशातील डेक कॅडेट आदित्य शर्मा (वय २३) आणि उत्तर प्रदेशातील फिटर शिवानंद चौरसिया (वय ३७) यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे या तिन्ही खलाशांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आता त्यांच्याकडे केवळ आणि केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत.
१५ व्या लग्नाचा वाढदिवस ठरला अपूर्ण; सुरेश यांच्या पत्नीचा आक्रोश
विशाखापट्टणमचे रहिवासी असलेले चीफ इंजिनिअर सुरेश पटनाला गेल्या पाच महिन्यांपासून समुद्रावर होते. २४ जून रोजी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस होता. हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी सुट्टी मंजूर करून घेतली होती आणि ते मुंबईमार्गे घरी परतणार होते. ९ जून रोजी त्यांनी पत्नी भार्गवी यांच्याशी शेवटचे बोलणे केले होते. “काळजी घ्या,” या भार्गवी यांच्या शब्दांवर, “मी काळजी घेत आहे,” असे उत्तर सुरेश यांनी दिले होते. पण दोन दिवसांतच थेट त्यांच्या मृत्यूची बातमी घरी आली.
१० आणि १३ वर्षांच्या दोन लहान मुलांसह पतीच्या आठवणीत रडणाऱ्या भार्गवी म्हणाल्या, “आता आमचा सांभाळ कोण करणार? समुद्रात खूप धोके आहेत हे जाणूनही आमच्या चांगल्या भविष्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ही नोकरी सोडली नव्हती. आमची स्वप्ने आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.”
“वारंवार इशारे मिळत होते…” आदित्यचा वडिलांशी झालेला तो शेवटचा संवाद
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे रहिवासी असलेले २३ वर्षीय आदित्य शर्मा या जहाजावर ‘डेक कॅडेट’ म्हणून कार्यरत होते. चेन्नई आणि स्कॉटलंडमधून ‘नॉटिकल सायन्स’चे उच्च शिक्षण घेतलेले आदित्य मे महिन्यातच मायदेशी परतणार होते, पण त्यांनी आणखी दोन महिने काम करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय घातकी ठरला. ७ जून रोजी त्यांनी वडिलांशी व्हॉट्सॲप कॉलवर साधलेला संवाद हा त्यांचा शेवटचा ठरला.
आदित्यचे वडील राजेश शर्मा यांनी अत्यंत भावूक होऊन सांगितले, “गेल्या १५ दिवसांत अमेरिकन नौदलाने जहाजाला दोनदा कडक चेतावणी दिली होती, तरीही जहाज पुढे जात होते. आदित्यने आम्हाला धीर दिला होता, पण त्यानंतर तासाभरातच त्याच्या मृत्यूची वार्ता आली. वारंवार इशारे मिळत असताना इतक्या लोकांचे प्राण धोक्यात का घालण्यात आले?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
“दारिद्र्य संपेल अशी आशा होती, पण सर्व काही संपले”; शिवानंद यांच्या कुटुंबावर शोककळा
उत्तर प्रदेशच्या सिरौली गावातील ३७ वर्षीय शिवानंद चौरसिया या जहाजावर फिटर म्हणून काम करत होते. यापूर्वी पुण्यात एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणारे शिवानंद गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घराचे दारिद्र्य संपवण्याच्या आणि चांगल्या पगाराच्या आशेने या जहाजावर गेले होते. दोन दिवसांपूर्वीच शिवानंद यांनी त्यांची पत्नी सुशीला, ६ वर्षांचा मुलगा समर आणि २ वर्षांची मुलगी वामिका यांच्याशी फोनवर बोलून ‘मी लवकरच घरी येईन’ असे वचन दिले होते.
त्यांचे ७० वर्षीय वृद्ध वडील रामजी चौरसिया जड अंतःकरणाने म्हणाले, “शिवानंदला जहाजावर चांगली नोकरी मिळाल्यामुळे आमच्या घराचे दिवस बदलतील अशी आशा होती. घराचा मोठा आधार गेला, आता आमचे सगळे काही संपले.”
आंतरराष्ट्रीय तणाव आणि अमेरिकेचा दावा
हा हल्ला ज्या भागात झाला, ती होर्मुजची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय तेल वाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अमेरिकन सैन्याने या भागात नाकेबंदी केली आहे. अमेरिकन लष्कराच्या दाव्यानुसार, ‘एमटी सेटबेलो’ या जहाजाने वारंवार दिलेले इशारे धुडकावून ही नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी ही कारवाई करण्यात आली.
काँग्रेसची टीका
मृत खलाशांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही सहवेदना व्यक्त करीत आहोत असे म्हणत काँग्रेसने याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. “नागरी वाहतूक धोक्यात टाकणाऱ्या अमेरिकेच्या या हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याबरोबर वैयक्तिक उत्तम संबंध असल्याचे वारंवार दाखवले आहे. त्यांचे हे उत्तम संबंध भारतीयांचे जीव वाचविण्यामध्ये उपयोगी ठरलेले नाहीत. ते या जबाबदारीपासून पळ काढू शकणार नाहीत. सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलून जबाबदारी निश्चित करावी,” असे काँग्रेसने नमूद केले आहे.
