जम्मू काश्मीरच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे १९ आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या १९ आमदारांनी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे आमदार बंडाचं निशाण फडकावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या १९ नाराज आमदारांनी सलग ४ तास गुप्त बैठक घेतल्याने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे नाराज झालेल्या आमदारांनी थेट ओमर अब्दुल्ला यांच्या सल्लागारांना हटवण्याची आणि मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे काय भूमिका घेतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.

जम्मू काश्मीरमधील या राजकीय घडामोडीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या १९ आमदारांनी श्रीनगरमधील एका आमदाराच्या निवासस्थानी तब्बल ४ तास गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. या घडामोडीमुळे नॅशनल कॉन्फरन्स पक्षातही मोठी खळबळ उडाली आहे.

आमदारांनी काय मागणी केली?

वृत्तानुसार, या आमदारांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या निकटवर्तीय असलेल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या सल्लागारांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, पक्ष नेतृत्व आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असून अद्याप पक्षाला या आमदारांना मनवण्यात यश आलेलं नाही.

दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी एका निकटवर्तीयाला या आमदारांशी चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. मात्र, आमदारांनी त्या निकटवर्तीयाशी चर्चा करण्यास नकार दिला आणि थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलण्याची मागणी केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. यातील एका आमदाराने म्हटलं की, ‘आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या सहकाऱ्याशी काहीही चर्चा करायची नाही.’

फारुख अब्दुल्लांची बंडखोर आमदारांशी चर्चा

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देखील काही बंडखोर आमदारांशी चर्चा करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्या आमदारांना दीड वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील आणि ज्यांना आता संधी मिळालेली नाही, त्यांना तेव्हा स्थान दिलं जाईल असं आश्वासन दिलं. मात्र, या बंडखोर आमदारांनी फारुख अब्दुल्ला यांचा हा प्रस्तावही फेटाळून लावल्याचं बोललं जात आहे.