जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी राजदान यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. “काल एका नव्या प्रवासाची सुरूवात झाली”, असे कॅप्शन लिहून ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर निधी राजदान यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ओमर अब्दुल्ला आणि राजदान यांच्या विवाहापासून देशभरात चर्चा रंगली आहे. मात्र, या लग्नावरून आता एक नवा धार्मिक वाद समोर आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी हा विवाह इस्लामिक प्रथांनुसार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मौलाना रझवी यांनी नेमका काय दावा केला?
मौलाना रझवी यांच्या म्हणण्यानुसार, शरिया कायद्यानुसार कोणतीही निकाह वैध ठरण्यासाठी दोन्ही व्यक्ती मुस्लिम असणे अनिवार्य आहे. ओमर अब्दुल्ला हे मुस्लिम धर्मीय आहेत, मात्र निधी राजदान या मुस्लिम नाहीत. त्यामुळे इस्लामिक दृष्टिकोनातून हा विवाह अमान्य आणि बेकायदेशीर ठरतो.
ओमर अब्दुल्ला यांनी निकाह करण्यापूर्वी निधी राजदान यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला हवा होता, असे मत रझवी यांनी व्यक्त केले. निधी राजदान यांनी इस्लाम स्वीकारून पूर्ण इस्लामिक पद्धतीने निकाह केला असता, तरच शरियानुसार या विवाहाला मान्यता मिळाली असती, असा दावा त्यांनी केला.
विवाहाला बेकायदेशीर ठरवण्यामागील कारणे
आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना मौलाना रझवी म्हणाले की, इस्लाममध्ये विवाहाबाबत स्पष्ट आणि विशिष्ट नियम आहेत. “जर पती किंवा पत्नीपैकी एकही व्यक्ती गैर-मुस्लिम असेल, तर असा विवाह शरियानुसार मान्य केला जाऊ शकत नाही,” असे त्यांनी नमूद केले. आवश्यक अटींची पूर्तता झाली नसल्यामुळे हा विवाह शरियाच्या दृष्टीने ‘नाजायज’ (अवैध) ठरतो, असे मत त्यांनी मांडले आहे.
कोण आहेत निधी राजदान?
माजी पत्रकार असलेल्या निधी राजदान एनडीटीव्हीच्या वरिष्ठ संपादक होत्या. वृत्त निवेदका आणि ‘लेफ्ट, राइट आणि सेंटर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा ‘द बिग फाइट’ हा शोदेखील बराच लोकप्रिय होता. जुलै २०१७ साली त्यांनी “लेफ्ट, राइट आणि सेंटर: द आयडिया ऑफ इंडिया”, हे पुस्तकदेखील लिहिले होते.
