J&K CM Omar Abdullah declines cutting a Tricolour-themed ribbon : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (१५ एप्रिल) एका हस्तशिल्प आणि हातमाग प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी तिरंगी फित कापण्यास नकार दिला. त्यांनी ती फित कापण्याऐवजी संयोजकांना ती सन्मानाने काढून सुरक्षित ठेवण्यास सांगितले. यासंदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फितीवर केशरी, पांढरा आणि हिरवा असे राष्ट्रध्वजाचे रंग असल्याचे लक्षात येताच अब्दुल्ला यांनी ती न कापण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः ती फित सोडवली आणि संयोजकांच्या स्वाधीन करत तिचा योग्य सन्मान राखून ती जतन करण्याच्या सूचना दिल्या. श्रीनगरमधील ‘काश्मीर हाट’ येथे ‘नो युअर आर्टिस्ट्स’ (Know Your Artisans) या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ही घटना घडली.
या घटनेचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. रिबन कापण्यासाठी जवळ गेल्यावर त्यावरील रंग पाहून अब्दुल्ला तिथेच थांबल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडला
यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि सल्लागार नासिर अस्लम वानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रिबन हटवल्यानंतर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधील कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन केले.
यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी श्रीनगरच्या दल सरोवर येथे आयोजित ‘तिरंगा यात्रा’ मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी देशाच्या अभिमानामध्ये तिरंग्याचे असलेले स्थान अधोरेखित केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “राष्ट्रध्वज हा आपल्या एकता, शांतता आणि सौहार्दाचे जिवंत प्रतीक आहे. तिरंग्यामध्ये पिढ्यानपिढ्यांच्या आशा आणि बलिदानांचे प्रतिबिंब आहे आणि तो भारताची खरी शक्ती असलेल्या विविधतेचे दर्शन घडवतो. मी प्रत्येकाला आवाहन करतो की त्यांनी याचे जतन करावे आणि धर्मनिरपेक्षता व बंधुभावाच्या आदर्शांचे पालन करावे.”
त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, “पूर्वी राष्ट्रध्वज केवळ सरकारी इमारतींवरच फडकवला जाऊ शकत होता. पण एका व्यक्तीने ही परिस्थिती बदलण्याचा विडा उचलला. ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? ते शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते, तिथे त्यांनी पाहिले की त्यांचे मित्र आपल्या देशाचा ध्वज आपल्या खोलीत ठेवतात, पण त्यांना तसे करता येत नव्हते. भारतात परतल्यावर त्यांनी लढा दिला, न्यायालयात गेले आणि घरातही ध्वज फडकवण्याची परवानगी देणारा निकाल मिळवला. याचा सारांश असा की, एखादी व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर बदल घडवू शकते. आपण राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा जपली पाहिजे; ती आपली ओळख आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.”
