रामबन येथे झालेल्या गोळीबाराचे अयोग्य वृत्तसंकलन केल्याचा ठपका जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काही प्रसिद्धीमाध्यमांवर ठेवला आहे. अशा प्रकारांमुळे स्थितीत सुधार होण्यास मदत होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी झालेल्या गोळीबारात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्याबद्दल अब्दुल्ला यांनी सहवेदना व्यक्त केल्या. मात्र ज्या पद्धतीने मृतांच्या संख्येबाबत वृत्त प्रसिद्ध झाले त्याने स्थिती सुधारण्यास मदत होणार नाही, असे अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे.
गोळीबारात केवळ चार जण ठार झाले असतानाही अनेक दूरदर्शन वाहिन्या आणि राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर चारपेक्षा अधिक जण ठार झाल्याचे म्हटले आहे. केवळ चार जण मरण पावले आहेत, मीडियात आल्याप्रमाणे सहा-सात जण मरण पावलेले नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.