द हेग : दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूने जगभरात पाय पसरायला सुरुवात केली असून अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. करोनाच्या अन्य उत्पादित विषाणूपेक्षा ओमायक्रॉन अधिक चिंताजनक असल्याबाबत संशोधकांनी मात्र अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

जगभरात आतापर्यंत २६ कोटींहून अधिक जणांना करोनाची लागण झाली, तर ५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला. त्यामुळे करोनाच्या या नव्या उत्परिवर्तित विषाणूमुळे अनेक देशांनी चिंता आणि भीती व्यक्त केली असून तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. इस्रायलने परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे, तर मोरोक्कोने दोन आठवडय़ांसाठी परदेशातून येणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. हाँगकाँगपासून युरोप ते उत्तर अमेरिकेपर्यंत बहुतेक देशांतील संशोधकांनी ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या असण्याला पुष्टी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा विचार असल्याचे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी सांगितले.

अनेक देशांमध्ये रुग्ण

जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून हॉलंडमध्ये रविवारी १३ रुग्णांना करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूची लागण झाली आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या १३ जणांची चाचणी केली असता त्यांना ओमायक्रॉनची लागणी झाल्याचे सिद्ध झाले. अ‍ॅमस्टरडॅमच्या विमानतळावर परदेशातून आलेल्यांची चाचणी केल्यानंतर ६१ जणांना करोनाची लागण झाली असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

ओमायक्रॉनच्या स्वरूपाबाबत अद्याप स्पष्टता नाही

संयुक्त राष्ट्रे : नव्याने शोध लागलेला ‘ओमायक्रॉन’ हा उत्परिवर्तित विषाणू अधिक संक्रमित होणारा आहे किंवा जगभरात पसरलेल्या ‘डेल्टा’सह इतर उपप्रकारांच्या तुलनेत त्याच्यामुळे होणाऱ्या रोगाची तीव्रता अधिक आहे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘ओमायक्रॉन’शी संबंधित लक्षणे इतर उत्परिवर्तित प्रकारांच्या लक्षणांपेक्षा वेगळी आहेत काय, हे सुचवणारी कुठलीही माहिती सध्या उपलब्ध नाही, असे या संघटनेने सांगितले. सुरुवातीला नोंदवण्यात आलेल्या संसर्गाची माहिती विद्यापीठांतील अभ्यासावर आधारित होती- ज्यात रोगाची सौम्य लक्षणे असणाऱ्या तरुणांचा समावेश होता- मात्र ओमायक्रॉन उपप्रकाराच्या तीव्रतेची पातळी समजून घेण्यासाठी काही दिवसांपासून ते अनेक आठवडे लागू शकतील, असेही संघटनेने नमूद केले.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिंताजनक उपप्रकार’ म्हणून निर्देशित केलेल्या बी१.१.५२९ या विषाणूचा शोध आणि संक्रमण क्षमता याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ओमायक्रॉनचे अनेक पैलू समजून घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका व जगभरातील संशोधक अभ्यास करत असून, या अभ्यासांचे निष्कर्ष जसजसे उपलब्ध होतील, तसतसे ते सर्वाना त्याबाबत माहिती देतील.