गेल्या तीन आठवड्यांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी जागतिक पातळीवर बरीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक संस्था त्याच्या घातकतेबाबत आणि त्याच्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या लसींच्या परिणामकारकतेबाबत संशोधन करत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये या नव्या व्हेरिएंटबाबत कमालीची भिती निर्माण झाल्याचं चित्र समोर दिसून येत आहे. त्यामुळे नेमका हा व्हेरिएंट किती घातक आहे आणि त्याच्यासाठी सध्याच्या लसी पुरेशा आहेत की नव्या लसीची आवश्यकता भासेल, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी दिलासादायक बाब सांगितली आहे. यामुळे जगभरातल्या नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

WHO नं दिलं स्पष्टीकरण..

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन विभागाचे संचालक मायकेल रियान यांनी करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. “ओमायक्रॉन हा वेगाने प्रसार होणारा व्हेरिएंट आहे. मात्र, याआधी करोनाच्या सापडलेल्या डेल्टासारख्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन जास्त घातक आहे हे दर्शवणारी कोणतीही चिन्ह दिसलेली नाहीत. सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या करोना लसी या व्हेरिएंटपासून देखील आपला बचाव करू शकतात”, असं मायकेल यांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्या लसी प्रभावी…

दरम्यान, आपल्याकडच्या लसी अत्यंत प्रभावी असल्याचं मायकेल यांनी नमूद केलं आहे. एएपपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “आत्तापर्यंत आलेल्या करोना व्हेरिएंटच्या विरोधात आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या लसी अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. मग ते करोनामुळे मोठे आजार होण्यापासून संरक्षण असो वा रुग्णालयात दाखल होण्यापासून बचाव असो. ओमायक्रॉनविरोधात त्या प्रभावी ठरणार नाही, हे सिद्ध करण्यासाठी सध्या कोणतंही कारण नाही”.

अधिक अभ्यास आवश्यक

दरम्यान, सध्या ओमायक्रॉन घातक दिसत नसला, तरी यासंदर्भात अधिक सखोल अभ्यास आवश्यक असल्याचं मायकेल यांनी स्पष्ट केलं आहे. “ओमायक्रॉनवर नेमके उपचार कसे करावेत, याविषयी सविस्तर माहिती मिळण्यासाठी अधिक सखोल अभ्यास आणि संशोधन आवश्यक आहे”, असं ते म्हणाले.

Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनी देखील अशाच स्वरुपाचं स्पष्टीकरण दिलं होतं. “ओमायक्रॉन वेगाने प्रसार होणारा व्हेरिएंट आहे याच अजिबात शंका नाही. पण आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार तो डेल्टापेक्षा कमी घातक असू शकतो. मात्र. त्याची नेमकी गुणसूत्र आणि त्यांचा प्रभाव याची माहिती मिळण्यासाठी सखोल संशोधनाची आवश्यकता आहे” असं ते म्हणाले होते.