Covid 19: ओमायक्रॉनच्या नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती; क्वारंटाइनमध्ये वेगवेगळ्या रुममध्ये असतानाही संसर्ग

विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एकमेकांपासून दूर अंतरावर असतानाही दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

Omicron, Covid 19, Corona, Coronavirus, Hong Kong
विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एकमेकांपासून दूर अंतरावर असतानाही दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे (File Photo: Reuters)

जगावर भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉनच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे चिंता वाढली आहे. हाँगकाँगमध्ये हॉटेलमध्ये विलगीकरणात असतानाही ओमायक्रॉनची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एकमेकांपासून दूर अंतरावर असतानाही दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Emerging Infectious Diseases या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दोन्ही प्रवाशांचं लसीकरण झालं आहे. यामुळेच दोन्ही प्रवाशांना लागण झाल्याने ओमायक्रॉनचा वेगाने होणारा संसर्ग आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवत आहे.

“हाँगकाँगमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या पूर्ण लसीकरण झालेल्या तसंच कोणतीही लक्षणं नसलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यासोबतच त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या एका रुममध्ये राहत असलेल्या पूर्ण लसीकरण झालेल्या आणखी एका प्रवाशाला लागण झाली असून कठोर विलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतरही संसर्ग होत असल्याचं सिद्ध होत आहे,” असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

अभ्यासात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रुग्णाने १३ नोव्हेंबर २०२१ ला आपला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला होता. कोणतीही लक्षणं नसणाऱ्या या रुग्णाला नंतर रुग्णालयात आणि विलगीकरणात ठेवण्यात आलं. तर दुसऱ्या रुग्णाला १७ नोव्हेंबरला थोडीशी लक्षणं जाणवू लागली. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

सीसीटीव्ही तपासण्यात आलं असता दोन्ही रुग्ण आपल्या रुममधून अजिबात बाहेर आले नव्हते तसंच एकमेकांना भेटलेही नव्हते असं स्पष्ट होत आहे. यामुळे जेवणासाठी किंवा करोना चाचणीसाठी दरवाजा उघडला असता हवेच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. “मात्र हे दोन्ही रुग्ण एक दिवसाच्या अंतराने आल्याने एका दिवशी चाचणी होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हवेच्या माध्यमातूनच हा संसर्ग झाल्याची सर्वात जास्त शक्यता आहे,” असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

ओमायक्रॉन सर्वात प्रथम ११ नोव्हेंबरला बोत्सावनामध्ये आणि त्यानंतर तीन दिवसांनी दक्षिण अफ्रिकेत आढळला होता. तेव्हापासून दक्षिण अफ्रिेत ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. भारतातही ओमायक्रॉन दाखल झाला असून २० रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी आधीच करोनाशी लढा दिलेल्यांना ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र ओमायक्रॉन जास्त धोकादायक आहे का? तो लोकांना गंभीर आजारी पाडतो का? लसींचा प्रभावही कमी करतो का? याची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omicron may have spread between 2 rooms at hong kong quarantine hotel study sgy

ताज्या बातम्या