दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांनी लहान मुलांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. देशामध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत १६ हजार ५५ करोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २५ जणांचा करोना संसर्गाने मृत्यू झालाय. असं असतानाच नॅशनल इंन्स्टीट्यूट ऑफ कम्युनिकेबल डीसीज म्हणजेच एनआयसीडीच्या डॉक्टर वसीला जसत यांनी लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये वाढणारा करोना संसर्ग हा चिंतेची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ, मुलांमधील वाढता संसर्ग अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली

“पूर्वी लहान मुलांना करोनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला नव्हता. लहान मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची आवश्यकता यापूर्वी भासली नव्हती. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या अनेक मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. १५ ते १९ वर्षांच्या मुलांनाही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करावं लागत आहे,” असं डॉ. जसत म्हणाल्या आहेत. मात्र अचानक ही वाढ का झाली आहे, यामागे ओमायक्रॉन विषाणू कारणीभूत आहे का यासंदर्भात सखोल अभ्यास आणि संसोधन करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही करोनाची पुढची लाट लहान मुलांसाठी जास्त धोकादायक असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. त्यामुळेच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये वाढणारा संसर्ग हा काळजी वाढवणार मुद्दा आहे.

नक्की वाचा >> ओमायक्रॉनमुळे हाहाकार… बेल्जीयममध्ये निर्बंधांना विरोध करताना हिंसाचार तर ऑस्ट्रेलियात लस समर्थक, विरोधक आमने-सामने

“आता नव्या लाटेमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र त्यातही चिंतेची बाब म्हणजे पाच वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. पाच वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण हे ६० वर्षांवरील वयोगटाच्या तुलनेत कमी असलं तरी पूर्वीपेक्षा अधिक आहे. करोना संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण ६० वर्षांवरील लोकांमध्ये अधिक आहे. वयस्कर व्यक्तींनंतर करोना वेगाने पसरण्याचा वयोगट हा पाच वर्षांखालील आहे. पूर्वी लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचं प्रमाण कमी होतं. आता मात्र रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या वाढल्याचं दिसतंय,” असं डॉ. जसत म्हणालेत.

एनआयसीडीचे डॉ. मायकल ग्रूम यांनी प्रशासन करोना रुग्णसंख्या वाढीसाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. “करोनाबाधितांचं प्रमाण वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तयारी कशी आहे यावर विशेष भर देणं गरजेचं आहे. यात मुलांसाठी बेड्स उपलब्ध करुन देणं आणि कर्मचारी संख्या वाढवणं हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत,” असं ग्रूम म्हणालेत. आरोग्य मंत्री जो फहला यांनी दक्षिण आफ्रिकेमधील नऊ प्रांतांपैकी सात प्रांतांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढलीय.