जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणारा करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप नेमका कसा आणि किती घातक आहे, याविषयी सध्या युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. त्याची लक्षणं, त्यावरचे उपचार, सध्या जगात अस्तित्वात असलेल्या लसींची ओमायक्रॉनवरची परिणामकारकता या सर्वच बाबींविषयी अद्याप ठोस अशी माहिती समोर आलेली नसली, तरी ज्या दक्षिण अफ्रिकेत सर्वात आधी हा व्हेरिएंट आढळला, तिथल्या तज्ज्ञांनी ओमायक्रॉनच्या काही मूलभूत बाबींचं निरीक्षण करून निष्कर्ष मांडले आहेत. यावरून ओमाक्रॉन किती धोकादायक आहे किंवा त्याची लक्षणं काय असू शकतात, याविषयीचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.

तुम्हाला जर लक्षणं माहिती नसतील, तर…

दक्षिण अफ्रिकेत सर्वप्रथम ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाहूल लागलेल्या डॉ. अँजेलिक कोट्झी यांनी यासंदर्भात एएनआयला दिलेल्या एक्स्क्लुजिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणतात, “ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बीटा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्युटेशन असलेला व्हेरिएंट आहे. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग अधिक असतो. शिवाय, तुम्हाला जर या व्हेरिएंटची लक्षणं माहिती नसतील, तर त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष होऊ शकतं इतका तो बेमालूमपणे पसरू शकतो”.

Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन? जाणून घ्या!

Omicron ची लक्षणं काय?

डॉ. कोट्झी यांनी सर्वप्रथम या नव्या व्हेरिएंटची माहिती जगाला दिली होती. त्यांनी तपासणी केलेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून ओमायक्रॉनची संभाव्य लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. त्या म्हणाल्या, “मी तपासलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने थकवा हे लक्षण दिसून आलं. अंगदुखी देखील जाणवू शकते. काहींना प्रचंड डोकेदुखी आणि थकवा आला होता. पण यापैकी कुणीही वास किंवा चव गेल्याची तक्रार केली नव्हती. तसेच, नाक बंद होणं किंवा खूप जास्त ताप देखील दिसून आला नाही”.

हे फक्त प्राथमिक अंदाज, अजून संशोधन सुरू

दरम्यान, हे सर्व अंदाज किंवा निरीक्षणं प्राथमिक पातळीवरील असून त्यावर अद्याप संशोधन आणि अभ्यास सुरू असल्याचं डॉ. कोट्झी यांनी स्पष्ट केलं. “म्युटेशनच्या बाबतीत ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बिटापेक्षा खूप वेगळा आहे. जेव्हा आमच्या वैज्ञानिकांनी या व्हेरिएंटबाबत जगाला सांगितलं, तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की त्यांना ओमायक्रॉनबाबत सर्वकाही माहिती नाही. ते सध्या फक्त त्याचं सिक्वेन्सिंग करत आहेत”, असं त्या म्हणाल्या.