“ओमायक्रॉन हा करोनाचा शेवटचा व्हेरिएंट नाही, भविष्यात अनेक…;” WHOचा गंभीर इशारा

आपण साथीच्या रोगाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत, असंही त्या म्हणाल्या.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

जगभरात करोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही दैनंदिन रुग्ण ३ लाखांपेक्षा जास्त आढळत आहेत. तर, जागतिक आरोग्य संघटना लोकांना लसीकरण करून मास्कचा वापर सुरू ठेवण्यासाठी सावध करत आहे. यातच आता डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओमायक्रॉन हा करोनाचा शेवटचा व्हेरियंट असणार नाही. याचे भविष्यात आणखी अनेक प्रकार येतील, असं त्या म्हणाल्या आहेत.  

“हा विषाणू अजूनही विकसित होत आहे आणि बदलत आहे आणि आपल्याला त्यानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जगभरातील लसीकरण वाढवायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्वाचं म्हणजे करोना हा आता ज्यामुळे करोनाची लाट आहे त्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संपणार नाही. याचे भविष्यात आणखी व्हेरिएंट येतील,” असं मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी बीबीसीला एका मुलाखतीत सांगितले.

“जगभरात ओमायक्रॉन आणि करोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य प्रणालीवर मोठा ताण पडत आहे. त्यातच  आपण साथीच्या रोगाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत. जर लोकांना आवश्यक असलेली योग्य काळजी मिळत नसेल तर मोठ्या प्रमाणात लोकांना गंभीर आजार होतील आणि मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होतील, हेच आम्ही रोखू इच्छितो,” असं त्या म्हणाल्या.

लसीकरण हा गंभीर रोग, मृत्यू, काही इंफेक्शन आणि पुढील संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विश्वसनीय उपाय आहे, मात्र तो परिपूर्ण नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालून, सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, तोंड आणि हात धुणे, गर्दी टाळणे, घरून काम करणे, आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेणे आणि चाचणी करून घेणे, या गोष्टी करणे आवश्यक आहे,” असं मारिया म्हणाल्या.

“लसीकरण सुरू झाल्यापासून जगभरात लसींच्या १० अब्ज डोसपैकी, अद्याप तीन अब्ज लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. म्हणून, आपल्याकडे अजूनही अत्यंत संवेदनाक्षम लोकसंख्या आहे. लसीकरणाच्या बाबतीत काही देश पुढे आहेत. त्यामुळे आपल्याला या जागतिक समस्येवर जागतिक उपायांसह उपचार करावे लागतील,” अशी गरज त्यांनी बोलून दाखवली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omicron will not be last covid 19 variant future mutations could be adept at surviving says who hrc

Next Story
लष्करात आणखी K-9 वज्र तोफा दाखल होणार, सीमेवरचा तणाव लक्षात घेता लष्कराच्या दीर्घकालीन उपाययोजना सुरु
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी