सध्या संपूर्ण जगाभरामध्ये करोनाच्या नव्या ओमायक्रॉन या विषाणूमुळे चिंता व्यक्त केली जातेय. अधिक घातक आणि वेगाने म्युटेशन होणारा हा करोनाचा प्रकार असल्याचं सांगितलं जात असून दिवसोंदिवस या नव्या प्रकारच्या करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. असं असतानाच या चिंतेत भर टाकणारी बातमी जिथे पहिल्यांदा या ओमायक्रॉनचा विषाणू आढळून आलेला त्या दक्षिण आफ्रिकेतून आलीय. दक्षिण आफ्रिकेमधील करोनाबाधितांची संख्या बुधवारी दुप्पटीने वाढली आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> भारतीय क्रिकेट संघालाही ‘ओमायक्रॉन’चा फटका; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI ने घेतला मोठा निर्णय

मंगळवारी दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाबाधितांची संख्या चार हजार ३७३ होती. बुधवारी हीच संख्या जवळजवळ दुपट्टीने वाढून आठ हजार ५६१ वर पोहचली आहे. करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असून त्यासंदर्भातील तयारीसाठी सज्ज रहावे असा इशारा दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी दिलाय. “पुढील आठवड्याभरामध्ये करोनाबाधितांची संख्या दुप्पटीने किंवा तिप्पटीने वाढण्याची दाट शक्यता आहे,” असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसाठी दक्षिण आफ्रिकेत स्थानिक स्तरावर काम करणारे डॉ. निक्से गुमेडे-मोइलत्सी यांनी व्यक्त केलंय. “पुढील काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमधील करोनाबाधितांच्या संख्येमध्ये फार मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसू शकतं,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला करोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. सात दिवसांच्या सरासरीमध्ये सर्वात कमी म्हणजेच दिवसाला २०० रुग्ण एवढं खाली हे प्रमाण गेलं होतं. मात्र नोव्हेंबरच्या मध्यापासून पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय. नोव्हेंबरच्या सुरुवातील पॉझिटीव्हीटी रेट हा एक टक्के इतका होता. काल (१ डिसेंबर २०२१ रोजी) हा दर १६.५ टक्क्यांपर्यंत गेल्याचं पहायला मिळालं. यापूर्वी या देशामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला होता. या कालावधीमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे दिवसाला २० हजार रुग्ण आढळून येत होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत ९० हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय.

दक्षिण आफ्रिकेतील रुग्णवाढीसाठी केवळ ओमायक्रॉन हा नवीन विषाणू कारणीभूत आहे असं म्हणणं सध्या घाईचं ठरेल असं तज्ञ सांगत असेल तरी ओमायक्रॉनमुळेच हा रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नसल्याचंही सांगतात. पीसीआर चाचण्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचं समजते. मात्र तो ओमायक्रॉनमुळे झालाय हा हे समजून घेण्यासाठी पूर्ण जेनेटिक सिक्वेन्सिंग चाचणी करावी लागते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omicron worry covid cases in south africa double in a day scsg
First published on: 02-12-2021 at 13:07 IST