बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ओमप्रकाश चौटाला दोषी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीतील न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे.

चंडीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीतील न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे. याप्रकरणी येत्या गुरुवारी शिक्षेचा कालावधी जाहीर केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. दिल्लीतील रौस अव्हेन्यू न्यायालयाने हा निकाल दिला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद २० मे रोजी पूर्ण झाले होते. शनिवारी सुनावणीच्या वेळी चौटाला हेसुद्धा उपस्थित होते. 

याप्रकरणी तपास केलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौटाला यांच्याविरोधात २६ मार्च २०१० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. सात वेळा आमदार राहिलेल्या चौटाला यांनी १९९३ ते २००६ जमा केलेली सहा कोटी ९ लाख रुपयांची संपत्ती ही त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा कितीतरी अधिक असल्याचा आरोप सीबीआयने केला होता.  राजकीय सूडबुद्धीने हा खटला दाखल करण्यात आल्याचा दावा चौटाला कुटुंबीयांनी केला होता.    

दुसऱ्यांदा दोषी

याआधी ओमप्रकाश चौटाला यांना सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये जेबीटी शिक्षक भरती गैरव्यवहारात दोषी ठरविले होते. त्या खटल्यात त्यांना भ्रष्टाचाराबद्दल सात वर्षांची, तर गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाबाबत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गतवर्षी २ जुलै रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगाबाहेर आल्यावर राजकीयदृष्टय़ा सक्रिय झालेल्या चौटाला यांनी आपला पक्ष बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात दौरेही सुरू केले होते.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omprakash chautala convicted disproportionate assets case court property ysh

Next Story
बिहारमध्ये पावसाचे ३३ बळी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी