अमेरिकेतल्या व्हर्जिनिया या ठिकाणी एक भयंकर घटना घडली. चेहऱ्यावर मास्क घालून आलेल्या एका हल्लेखोराने एका सुपरमार्केटमध्ये शिरून गोळीबार केला. तसंच त्याने केलेल्या गोळीबारात ४५ वर्षीय मेघाबेन पटेल या महिलेचा मृत्यू झाला. या हल्लेखोराने या महिलेची हत्या केली. व्हर्जिनियामध्ये राहणारे भारतीय आणि गुजरातवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

सीसीटीव्हीमध्ये घटना झाली कैद

मेघनाबेन पटेल ही महिला त्या सुपर मार्केटमध्ये मागील दहा वर्षांपासून काम करत होती. ज्यावेळी सुपर मार्केटवर हल्ला झाला त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यात हे दिसून येतं आहे की एका मास्क घातलेल्या व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला आहे. त्यावेळी सुपर मार्केट रिकामं होतं. हा हल्लेखोर येतो, महिलेशी काहीतरी बोलतो आणि काही सेकंदांमध्ये बंदूक काढून गोळीबार सुरु करतो. गोळी लागताच ही महिला म्हणजेच मेघनाबेन खाली कोसळली. त्यानंतर काऊंटरवरुन उडी मारुन हा हल्लेखोर पुढे जातो आणि खाली कोसळलेल्या मेघनाबेनवर लागोपाठ गोळ्या चालवतो. हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मेघनाबेन पटेल १० वर्षांपासून करत होत्या सुपर मार्केटमध्ये काम

मेघनाबेन पटेल या मागील १० वर्षांपासून व्हर्जिनियाच्या सुपर मार्केटमध्ये काम करत होत्या. त्या मूळच्या गुजरातमधील मेहसाणातील विसापूरमध्ये असलेल्या जंत्राल गावाच्या रहिवासी होत्या. मेघनाबेन पटेल यांनी अज्ञात हल्लेखोराने हत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पती उपेंद्र पटेल, मुलगी नक्षीबेन पटेल आणि स्मिथ पटेल यांना रडू आवरत नाहीये, तसंच अचानक घडलेल्या या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा आघात झाला आहे.

नेमकं काय घडलं?

हल्लेखोर जेव्हा मेघनाबेन यांच्याजवळ गेला तेव्हा त्याने लगेचच त्यांच्यावर गोळीबार केला. मेघनाबेन खाली पडल्या तेव्हा त्याने काऊंटर ओलांडला आणि त्यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडल्या. ज्यात मेघनाबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हा हल्लेखोर कॅश बॉक्स घेऊन पळून गेला. पोलिसांनी यानंतर सुपर मार्केटचा परिसर सील केला आहे. तसंच सीसीटीव्हीच्या आधारे या हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मेघनाबेन मागच्या १० वर्षांपासून व्हर्जिनियामध्ये राहात होत्या आणि सुपर मार्केटमध्ये काम करत होत्या. त्यांचे आई वडील आजही गुजरातमधल्या त्यांच्या जंत्राल या गावातच राहतात. या बातमीमुळे त्यांच्या आई वडिलांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

या घटनेनंतर व्हर्जिनियातले पोलीस आता त्या अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले पुरावे गोळा केले आहेत. लुटीच्या उद्देशानेच या हल्लेखोराने मेघनाबेन पटेल यांच्यावर हल्ला केला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.