केरळमध्ये मोठ्या उत्साहाने ओणम सण साजरा केला जात आहे. राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटिज ट्विटरवरून सर्वांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही ट्विटरवरून केरळवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते या ट्विटमुळे अडचणीत आले आहेत. शहा यांनी भगवान विष्णू यांचा पाचवा अवतार वामन यांचा फोटो शेअर केला असून यात वामन यांनी महाबलीच्या (असूर राजा) डोक्यावर पाय ठेवल्याचे दिसते. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शहा यांनी हा फोटो शेअर करून केरळवासीय आणि ओणम सणाचा अवमान केल्याचे म्हटले आहे.
शहा यांच्या ट्विटपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केसरी या मल्याळम मासिकात ओणम हा सण वामन जयंतीप्रित्यर्थ साजरा केला जात असल्याचे म्हटले होते. यावरून मोठा वाद झाला होता. केरळ भाजपचे अध्यक्ष राजशेखर यांनी संबंधित लेखकाचे ते वैयक्तिक मत असल्याचा खुलासा करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, सर्वांना वामन जयंतीच्या शुभेच्छा.. वामन: भगवान विष्णूंचे पाचवे अवतार. शहा यांच्यावर सोशल मीडियावर मोठयाप्रमाणात टीका करण्यात आली. ओणम हा एक सांस्कृतिक आणि शेतीशी निगडीत सण असल्याचे म्हटले. केरळमधील सर्व समाजाचे लोक हा सण साजरा करतात. याला धार्मिक रंग देऊ नका, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले आहे.
शहा यांनी फक्त केरळवासीयच नव्हे तर तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधील लोकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे जे लोक वामन जयंती साजरा करतात त्यांना तशा शुभेच्छा दिल्या आहेत, असे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.
केरळमध्ये ओणम हा एक सामाजिक सण आहे. भाजप महाबली आणि ओणमशी संबंधित कोणत्याही नव्या प्रथेला थारा देत नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रशिक्षण आणि प्रकाशन केंद्रीय समितीचे प्रमुख आर. बालाशंकर यांनी दिले.
शहा यांनी सामाजिक मूल्यांचा अवमान केला
महाबली हे मल्याळी समाजाचे प्रतिक मानले जातात. त्यांना नरकात पाठवणाऱ्या वामनचे कौतूक करत शहा यांनी सामाजिक मूल्यांचा अपमान केला आहे. त्यांनी केरळ आणि केरळवासियांची बदनामी केली आहे. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.