हैदराबाद : तेलंगण राज्याने गेल्या आठ वर्षांमध्ये वेगाने वाटचाल व प्रगती केली असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

राज्याच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पब्लिक गार्डन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वज फडकावला. दरडोई उत्पन्नात झालेली वाढ, सर्व क्षेत्रांना चोवीस तास मोफत व दर्जेदार वीजपुरवठा, सिंचन व पेयजलाच्या अतिरिक्त सोयी करणे, लोकांचे कल्याण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व उद्योगासह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये विकास करून तेलंगण हे देशात आदर्श राज्य ठरले असल्याचे ते या वेळी म्हणाले.

काटेकोर असा दूरदर्शीपणा आणि परिपूर्ण नियोजन यामुळे २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याच्या महसुलाच्या स्रोतांत वाढ झाली आणि १७.२४ टक्क्यांच्या सरासरी वार्षिक आर्थिक वाढीसह तेलंगण हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले. अनेक अडथळे आणि करोनासारखी भीषण महासाथीची परिस्थिती उद्भवल्यानंतरही तेलंगण वेगाने प्रगती करत आहे, असे राव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठय़ासह सर्व क्षेत्रांना २४ तास अखंड दर्जेदार वीज पुरवणारे तेलंगण हे देशातील एकमेव राज्य आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. याशिवाय राज्यातील लोकांना सुरक्षित व स्वच्छ पेयजल पुरवण्यासाठी सरकारने ‘मिशन भगीरथ’ योजना सुरू केली आहे. त्यामुळे आज १०० टक्के घरांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती, ‘मिशन काकतीय’अंतर्गत तलावांचे पुनर्भरण, दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता, नकली बियाणे पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई, रयतु बंधू समित्यांचे गठन यांसारखे शेतकरीधार्जिणे कार्यक्रम सरकारने हाती घेतले असल्याचे चंद्रशेखर राव या वेळी म्हणाले.