राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस देशवासीयांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नागरिकांना करोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी बाळगण्याचे देखील आवाहन केले. तसेच, सर्वच क्षेत्रातील देशाच्या वाटचालीबाबतही मत मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतवासीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! हा भारतीयत्वाच्या अभिमानाचा उत्सव आहे जो आपल्या सर्वांना एकत्र बांधतो. प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस त्या महान वीरांच्या स्मरणाचाही एक प्रसंग आहे, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवले आणि त्यासाठी लढण्यासाठी देशवासीयांचा उत्साह जागवला. दोन दिवसांपूर्वी २३ रोजी जानेवारी, आपण सर्व देशवासियांनी ‘जय-हिंद’ ची घोषणा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण केले. स्वातंत्र्यासाठीचे त्यांचे कार्य आणि भारताला गौरवशाली बनवण्यासाठीची त्यांची महत्वकांक्षा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. ”

तसेच, “आव्हान करण्यात आल्यानंतर देशसेवेचे मुलभूत कर्तव्य पार पाडत, आपल्या कोट्यवधी देशवासीयांनी स्वच्छता मोहिमेपासून कोविड लसीकरण मोहिमेला जनचळवळीचे रूप दिले आहे. अशा अभियनांच्या यशाचे मोठे श्रेय आपल्या कर्तव्यदक्ष नागरिकांना जाते. मला सांगायला अभिमान वाटतो की, आपण करोना महामारी विरोधात असाधारण दृढनिश्चय आणि कार्यक्षमता दाखवली आहे. असंख्य कुटुंबे भयानक संकटातून गेली आहेत. आपल्या सामूहिक वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण दिलासा एवढाच की अनेकांचे प्राण वाचवता आले. कोविड महामारीचा प्रभाव अजूनही व्यापक आहे, त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे आणि आपल्या बचावात कोणतीही हलगर्जीपणा करू नये. आत्तापर्यंत आपण घेतलेली खबरदारी यापुढे घ्यावी लागणार आहे. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी दिलेल्या खबरदारीचे पालन करणे, हा आज प्रत्येक देशवासीयांचा राष्ट्रधर्म बनला आहे. हे संकट दूर होत नाही तोपर्यंत हा राष्ट्रधर्म पाळायचा आहे. ” असंही यावेळी राष्ट्रपती म्हणाले.

याचबरोबर, “भारताने जगातील टॉप 50 ‘इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी’मध्ये स्थान मिळवले आहे हे जाणून मला आनंद होत आहे. या यशाला आणखी समाधान देणारी गोष्ट म्हणजे आपण व्यापक समावेशावर भर देऊन गुणवत्तेला चालना देऊ शकलो आहोत. तर, गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. त्या युवा विजेत्यांचा आत्मविश्वास आज लाखो देशवासीयांना प्रेरणा देत आहे. आज आपले सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी देशभक्तीचा वारसा पुढे नेत आहेत. आपले सशस्त्र दल आणि पोलीस देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि अंतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस जागरुक राहतात जेणेकरून इतर सर्व देशवासीय शांतपणे झोपू शकतील. ” असं त्यांनी सांगितले.

“प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना भारताची चिकाटी या वस्तुस्थितीचा पुरावा आहे, की गेल्या वर्षी आर्थिक वाढ मंदावल्यानंतर या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था प्रभावी दराने वाढण्याची अपेक्षा आहे. देशभक्तीची भावना देशवासीयांच्या कर्तव्याला अधिक बळकट करते. तुम्ही डॉक्टर असो वा वकील, दुकानदार असो वा कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार असो वा मजूर, तुमचे कर्तव्य निष्ठेने व कार्यक्षमतेने पार पाडणे हे राष्ट्रासाठी तुमचे प्राथमिक आणि महत्त्वाचे योगदान आहे. ” असे देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the eve of republic day president ramnath kovind interacted with the people of the country msr
First published on: 25-01-2022 at 20:09 IST