एपी, लॉस एंजेलिस
प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये या वर्षी ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ आणि ‘हॅम्नेट’ यांनी आघाडी घेतली. पॉल थॉमस अँडरसन यांच्या ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दिग्दर्शक, पटकथालेखक म्हणून अँडरसन आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून तयाना टेलर असा चौरंगी सन्मान मिळाला आहे. यापूर्वी असा सन्मान एकमेव ऑलिव्हर स्टोन यांच्या ‘बॉर्न ऑन दी फोर्थ जुलाय’ला मिळाला होता.
‘वन बॅटल आफ्टर अनदर’ला विनोदी चित्रपटासाठी तर, नाट्यपूर्ण चित्रपटासाठी क्लोई झाओ यांच्या ‘हॅम्नेट’ला पुरस्कार मिळाला. लॉसे एंजेलिस येथे पार पडलेल्या ८३ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सुरूवातीचे बहुतेक पुरस्कार अपेक्षेप्रमाणे जाहीर झाले, मात्र शेवटच्या टप्प्यात ‘हॅम्नेट’ने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विल्यम शेक्सपियर आणि त्यांच्या पत्नी ॲग्नेस यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जेसी बक्ली यांना सर्वोत्तम अभिनेत्री (ड्रामा) म्हणून पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतर ‘हॅम्नेट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट (ड्रामा) म्हणून घोषिक करण्यात आले. त्यांनी पुरस्काराचे प्रमुख दावेदार ‘सिनर्स’ला मागे टाकले.
‘वन बॅटल आफ्टर अनादर’ आणि ‘सिनर्स’ या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा ठरला. ‘सिनर्स’ला सर्वोत्तम पार्श्वसंगीत आणि बॉक्स ऑफिस कमाईसाठीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने देशांतर्गत २७८ दशलक्ष डॉलर आणि जागतिक स्तरावर ३६८ दशलक्ष डॉलरची कमाई करत गेल्या १५ वर्षांतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून मान मिळवला.
यापूर्वी चार वेळा नामांकन मिळविणाऱ्या अभिनेता टिमथी शॅलमे यांना ‘मार्टी सुप्रीम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिला गोल्डन ग्लोब मिळाला. दूरचित्रवाणी विभागात ‘द पिट’ला सर्वोत्तम ड्रामा सिरीज, तर नेटफ्लिक्सच्या ‘अडोलसन्स’ला चार पुरस्कार मिळाले.
सोहळ्याच्या निवेदक निक्की ग्लेसर यांनी आपल्या उपरोधिक शैलीत हॉलीवूडमधील अस्थिरता, उद्योगातील बदलते वारे आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
वॉर्नर ब्रदर्स स्टुडीओचे सहप्रमुख मायकल डिलुका एक दिवस म्हणाले की मला हा स्टुडिओ चालवायचा म्हणजे चित्रपटकर्मींना जे निर्माण करायचे ते त्यांना करता येईल आणि हो, त्यातून तयार झाले सिनर्स, वेपन्स, वन बॅटल आफ्टर अनदर. हे मायकल डिलुका यांचेच यश म्हणावे लागेल. – पॉल थॉमस अँडरसन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘वन बॅटल आफ्टर अनादर’
विद्यार्थी म्हणून आपण अनेक दिग्गजांकडून शिकत आलो आहोत आणि यापुढेही तेच करत राहू. त्यासाठी एकमेकांना त्यांच्या कलाकृतींतून पाहत राहू आणि एकमेकांना दिसत राहण्यासाठी प्रोत्साहनही देत राहू. – क्लोई झाओ, निर्माती, ‘हॅम्नेट’
