काँग्रेसच्या अंताला राहुल गांधीच जबाबदार ठरतील, असा टोला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लगावला आहे. ‘देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्यात यावी, असे महात्मा गांधीचे स्वप्न होते. मात्र महात्मा गांधी जे करु शकले नाहीत, ते आता एक दुसरे गांधी करत आहेत,’ अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. हरियाणातील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

‘जेव्हा देशात काँग्रेसचे सरकार येते, त्यावेळी आर्थिक विकासाचा दर कमी होतो आणि ज्यावेळी भाजप केंद्रात सत्तेत असतो, त्यावेळी विकासाचा दर वाढतो. देशाला घराणेशाही, जातीवाद आणि लांगुलचालनाच्या राजकारणापासून मुक्त करण्याचे काम भाजपने केले आहे,’ असे अमित शहा यांनी त्यांच्या रोहतकमधील भाषणात म्हटले. ‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित केला जावा, अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती. मात्र महात्मा गांधी यांना ते जमले नाही. महात्मा गांधी यांना न जमलेली ही कामगिरी आता दुसरे गांधी पार पाडत आहेत,’ अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी राहुल गांधी यांना चिमटा काढला.

याआधी एकदा अमित शहा यांनी महात्मा गांधींबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केले होते. मागील महिन्यात अमित शहा यांनी महात्मा गांधी यांचा उल्लेख ‘चतुर बनिया’ असा केला होता. ‘महात्मा गांधी चतुर बनिया होते. भविष्यात काय होणार, याची त्यांना कल्पना होती,’ असे शहांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा सध्या हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतदेखील संवाद साधला. अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल राज्यातील जनतेच्या मनात मोठी उत्सुकता असल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले.