शंभर कोटी लसमात्रा देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब!

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, एक अब्ज लसमात्रांच्या उद्दिष्टपूर्तीबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले.

दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेतील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांचे अभिनंदन

नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लसमात्रांचा १०० कोटींचा अविस्मरणीय टप्पा हा निव्वळ आकडा नव्हे तर, देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. देशाच्या इतिहासातील नवा अध्याय असून मोठी लक्ष्ये ठेवून पूर्ण करण्याची क्षमता असलेला, त्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणारा हा नवा भारत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, एक अब्ज लसमात्रांच्या उद्दिष्टपूर्तीबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले. करोनासंदर्भात मोदींनी केलेले हे दहावे भाषण असून १९ मार्च २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या टाळेबंदीपूर्वी ‘जनता कफ्र्यू’च्या निमित्ताने त्यांनी देशाला उद्देशून संवाद साधला होता. देशाच्या लसीकरण मोहिमेवर अनेक शंकाकुशंका घेतल्या गेल्या, पण १ अब्ज लसमात्रांचा टप्पा म्हणजे सर्व शंकांना दिलेले उत्तर असल्याचे प्रत्युत्तर मोदींनी टीकाकारांना दिले. 

 देशातील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम शास्त्रीय आधारावर राबवली गेली आहे. देशव्यापी लसीकरण विज्ञानाच्या पोटातून जन्माला आले, चहुबाजूने विज्ञानाच्या आधारावर त्याची अंमलबजावणी झाली, असे मोदी म्हणाले.

शंकेखोर निरुत्तर

देशातील लसीकरण मोहिमेची तुलना अन्य देशांतील लसीकरणाशी केली गेली. इतक्या कमी वेळेत १ अब्ज लसमात्रा दिल्याबद्दल आता भारताचे कौतुक केले जात असले तरी, हे उद्दिष्ट गाठले जाईल याबद्दल अनेकांना खात्री नव्हती. पण भारताने लसीकरणाला सुरुवात कुठून केली हे लक्षात घेतले पाहिजे. लससंशोधन आणि निर्मितीतील कित्येक वर्षांचा अनुभव विकसित देशांच्या पाठीशी आहे. लशींसाठी भारत बहुतांशी याच देशांवर अवलंबून होता. त्यामुळे शतकातील सर्वात  घातक साथरोगाने जगाला व्यापले तेव्हा त्याविरोधात भारत कसा संघर्ष करू शकेल, असा प्रश्न विचारला गेला. अन्य देशांकडून लसखरेदीसाठी भारत पैसा कुठून उभा करेल? भारतीयांना लस मिळेल का? असेही प्रश्न मांडले गेले, पण आता भारत हा औषधनिर्मितीतील जागतिक केंद्र बनला असल्याचे जगाने मान्य केले आहे, असे मोदी म्हणाले.

वातावरण सकारात्मक, अर्थकारणाला गती

गेल्या दिवाळीत निराशा होती, तणाव होता. पण या वर्षी लसीकरणामुळे लोकांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण झाला आहे. लशींमुळे लोकांना सुरक्षाकवच मिळाले आहे. वर्षभरात दिवाळीत उत्पादकांची सर्वाधिक विक्री होत असते, यंदा छोटे दुकानदार, उद्योजक, फेरीवाले यांच्यासाठी लसमात्रा आशेचा किरण ठरला आहे. देशी-विदेशी पतमानांकन संस्थांनी देशाच्या आर्थिक विकासाबद्दल सकारात्मक अहवाल दिले आहेत. देशी कंपन्यांमध्ये नवी विक्रमी गुंतवणूक होत असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. नवउद्यमी कंपन्यांमध्येही मोठी गुंतवणूक होऊ लागली असून त्या ‘युनिकॉर्न’ बनू लागल्या आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातही नवी ऊर्जा दिसू लागली आहे. पायाभूत क्षेत्रातील गतिशक्ती योजनाही कार्यान्वित होत आहेत. केंद्राच्या धोरणात्मक निर्णयामुळे अर्थकारणालाही गती मिळू लागली आहे. करोनाच्या काळात शेती क्षेत्राने अर्थकारणाला आधार दिला. शेतीमालाची विक्रमी खरेदी केली जात असून शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे दिले जात आहेत, असे मोदी यांनी सांगितले. लोकांनी स्वदेशी मालाची खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा वास्तवात उतरवण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

‘व्हीआयपी संस्कृती’लाही फाटा

करोना प्रतिबंधक लसीकरण म्हणजे लोकशाही व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. ही मोहीम राबवताना ‘व्हीआयपी संस्कृती’लाही फाटा दिला गेला, असे मोदींनी भाषणात सांगितले. लोकशाही म्हणजे ‘सबका साथ’. त्यामुळे देशात सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. साथरोगाने भेदभाव केला नसेल तर, लसीकरणातही भेदभाव होऊ  नये. लसीकरणात सर्व देशवासी एकसमान असतील, हा एकच मंत्र बाळगून ‘व्हीपीआय संस्कृती’चा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली. केंद्र सरकारने साथरोगविरोधातील संघर्षात लोकांना सहभागी करून घेतले आणि हीच लढाईतील पहिली भक्कम तटबंदी ठरली, असे पंतप्रधान म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One hundred crore lasmatra a reflection of strength prime minister narendra modi akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या