पाकिस्तानातील निवडणूकपूर्व हिंसाचाराने रविवारी आणखी एका नेत्याचा बळी घेतला. अवामी नॅशनल पार्टी या धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते मुखर्रम शाह यांचे वाहन बॉम्बने उडवून त्यांची हत्या करण्यात आली.
तालिबान्यांचे प्राबल्य असलेल्या स्वात भागात ही दुर्घटना घडली. तालिबान्यांच्या विरोधातील ‘अमन लष्कर’ या स्थानिक लढवय्या गटाचे नेते असलेले मुखर्रम शाह हे स्वात खोऱ्यातील मंगलोर येथून बनजोत या ठिकाणी एका पिक-अप ट्रकने चालले होते.
दहशतवाद्यांनी रस्त्याच्या कडेला पेरलेल्या बॉम्बचा दूरनियंत्रकाच्या साह्य़ाने स्फोट करून त्यांची गाडी उडवली. त्यात ते जागीच ठार झाले. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली, तरी काही आठवडय़ांपूर्वी तहरिक-ए-तालिबानने अवामी नॅशनल पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुत्तहिदा कौमी मुव्हमेन्ट या संघटनांचे नेते आणि सभा यांच्यावर हल्ले करण्यात येतील अशी धमकी दिली होती. पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी निवडणूक होत आहे.