करोना व्हायरसने सध्या संपूर्ण जगताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात करोना झालेल्या लोकांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीमधील करोनाचा संसर्ग झालेला एक व्यक्ती करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने त्याचा संपूर्ण अनुभव एका व्हिडीओमार्फत शेअर केला असून त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ही व्यक्ती दिल्लीतील आग्रा येथे राहते. भारतात सर्वप्रथम करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी ही एक आहे. या व्यक्तीसोबतच त्याच्या कुटुंबीतील पाच सदस्यांना करोना झाल्याचे समोर आले होते. त्यांना तातडीने विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर योग्यपद्धतीने उपचार करण्यात आले. या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रामाणिकपणे डॉक्टरांना सहकार्य केले. आता त्यांची पुन्हा करोना चाचणी करताच ती निगेटीव्ह आली असून आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

घरी आल्यानंतर त्याने एक व्हिडीओ शेअर करत त्याचा अनुभव सांगितला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे देखिल सांगितले आहे. ‘तुम्हाला करोनाची कोणती ही लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णालयात दाखल व्हा. करोना व्हायरसची चाचणी करुन घ्या. ती चाचणी पॉझिटीव्ह येताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज करोनावरचे उपाय मोफत होत आहेत. जर हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरला तर खासगी रुग्णालयात दाखव होऊन स्वत:च्या पैशाने उपचार घेण्याची वेळ येऊ शकते. सरकार आणि डॉक्टरला पाठिंबा द्या. त्यांनी दिलेल्या सुचना योग्य पद्धतीने पाळा’ असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

‘आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. स्वच्छ हात धूवा. कमीतकमी लोकांना भेटा. सार्वजनिक ठीकाणी जाऊ नका. ज्या लोकांना हृदय आणि फुफुसाचे विकार आहेत त्यांच्यासाठी हा व्हायरस थोडा धोकादायक आहे. पण इतर सामान्य लोकांना याचा त्रास होणार नाही. करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला १४ दिवस विलगीकरण विभागात ठेवण्यात येते कारण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर कोणाला करोनाचा संसर्ग होऊ नये’ असे पुढे त्याने व्हिडीओमध्ये म्हणाला.

करोना व्हायरसमुळे देशातील ३० राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. देशात ही स्थिती ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. ट्रेन, बस सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत.